“PM मोदींनी एकही दिवस रजा घेतली नाही, देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा ध्यास”: DCM शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:39 IST2026-04-23T10:35:53+5:302026-04-23T10:39:09+5:30
Deputy CM Eknath Shinde: ‘देश प्रथम’ हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“PM मोदींनी एकही दिवस रजा घेतली नाही, देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा ध्यास”: DCM शिंदे
Deputy CM Eknath Shinde: देशाला प्रगतीपथावर नेणारे, भारताला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा ध्यास घेतलेले मोदी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. ‘देश प्रथम’ हीच त्यांची भूमिका आहे. अशा नेतृत्वावर अश्लाघ्य आरोप करणे ही काँग्रेसची खालची पातळी दाखवते, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वाला लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे. महिलांच्या सन्मानासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक भूमिका घेणाऱ्या नेतृत्वावर टीका करणे म्हणजे देशद्रोहाच्या जवळ जाणारे वक्तव्य आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने देशविरोधी सूर लावतात. त्यामुळे तेच खरे राष्ट्रद्रोही असल्याचे जनतेसमोर उघड होत आहे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल करताना, काँग्रेसच्या राजकीय भविष्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
देशाच्या सन्मानासाठी उभे राहत शत्रूंना प्रत्युत्तर दिले
ऑपरेशन सिंदूरच्या काळातही काँग्रेसने पाकिस्तानची भाषा बोलत भारतीय जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. पंतप्रधानांनी ठोस कारवाई करून देशाच्या सन्मानासाठी उभे राहत शत्रूंना प्रत्युत्तर दिले, पण काँग्रेसला तेही पचले नाही. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा न देता ते अडवण्याचा प्रयत्न केला, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही
काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही आहे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा एकनाथ शिंदे यांनी निषेध केला. १४० कोटी जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरत काँग्रेसने महिलांच्या हक्कांनाच विरोध केला आहे. त्यामुळे देशातील महिला वर्गात काँग्रेसविरोधात तीव्र संताप निर्माण झाला असून, आगामी काळात महिलाच काँग्रेसला धडा शिकवतील, असा घणाघात त्यांनी केला.
दरम्यान, अशा संतापजनक वक्तव्यांमुळे काँग्रेस स्वतःचीच कबर खोदत आहे. १४० कोटी जनता मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आगामी काळात विशेषतः महिला वर्ग काँग्रेसला धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणे, पाकिस्तानची भाषा बोलणे आणि राष्ट्रीय हिताला धक्का पोहोचवणे हे काँग्रेसचे खरे चेहरे आहे, असा आरोप करत शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.