“जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा विजय, सत्याचा नाही”; विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:57 IST2026-02-09T18:57:37+5:302026-02-09T18:57:37+5:30
Congress Vijay Wadettiwar News: महायुतीला मिळालेला विजय हा सत्याचा नसून केवळ सत्तेचा आहे. हा धनशक्तीचा विजय आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

“जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा विजय, सत्याचा नाही”; विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
Congress Vijay Wadettiwar News: १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागला. या निकालात महायुतीला मिळालेला विजय हा सत्याचा नसून केवळ सत्तेचा आहे. हा धनशक्तीचा विजय आहे, असे काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला चांगली मते मिळाली, यातूनच पुरोगामी विचारांची मते विभागण्यात भाजपा यशस्वी ठरली. मात्र, हे यश सत्तेचा गैरवापर करून मिळवलेले आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने तयारी केली असून काँग्रेसचा महापौर होणार असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात सत्तास्थापनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेले १० नगरसेवक, तसेच इतर मित्रपक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
दुपारी १२ वाजेपर्यंत सत्तेचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल
चंद्रपुरात काँग्रेसकडे सध्या २७ नगरसेवकांचे संख्याबळ असून, जनसुराज्य पक्षाचे ३ नगरसेवक आधीच सोबत आहेत. एमआयएम आणि बसपाने जनसुराज्य पक्षाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे एकूण आकडा ३० च्या पार गेला आहे. फक्त दोन नगरसेवकांच्या पाठिब्यांची आवश्यकता काँग्रेसला आहे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वातील १० नगरसेवकांचा गट आणि २ अपक्ष नगरसेवकांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्यास प्राधान्य दिले असल्याने पद वाटपाबाबत मध्यम मार्ग काढण्यात येईल. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौरपद काँग्रेसकडेच राहील. इतर पदांबाबत मित्रपक्षांना सन्मानजनक ऑफर देण्यात आली असून, त्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सकारात्मक आहे. उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत चंद्रपूर महापालिकेतील सत्तेचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, अस वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाकडे ३२ चा आकडा आहे व २ सदस्यांची गरज आहे. चंद्रपुरात उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडीने गट स्थापन केला आहे, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू असून उद्धवसेनेशी चर्चा झालेली आहे. तसा प्रस्ताव दिलेला आहे. परभणी महानगरपालिकेत उद्धवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे आणि जे होईल ते दोन्ही ठिकाणी होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.