Pratap Sarnaik Latest News: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून या परिसरात पोलिसांनी आंदोलकांविरोधात कारवाई सुरू केली. रात्रभर अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांची कारवाई दादागिरी आणि गुंडगिरी असल्याचे म्हणत प्रताप सरनाईकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वैतागले, असे सरनाईक म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माझी भूमिका मी स्पष्ट केलेलीच आहे. मी आधी मराठी आहे. आमदार आणि मंत्री नंतर... ही माझी भूमिका आहे. हे औटघटकेचं असतं."
मी चितेवर जाईपर्यंत मराठी -प्रताप सरनाईक
"मी म्हणालो आहे की, जन्मापासून ते चितेवर जाण्यापर्यंत मी मराठी राहणार आहे. मराठी असल्याचा मला अभिमान आहे. हिंदू असल्याचा मला जसा अभिमान आहे. तसाच मराठी असल्याचा अभिमान आहे. मी आधीच म्हणालो आहे की, पोलिसांनी चुकीचा निर्णय घेतला आणि ही परिस्थिती ओढवली आहे."
याच मुद्द्यावर पुढे बोलताना सरनाईक म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांकडे सकाळीच तक्रार केली. डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आणि वातावरण प्रदूषित केले. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आज जो प्रकार घडलेला आहे, तो फक्त आणि फक्त पोलिसांच्या चुकीच्या निर्णयामुळे घडलेला आहे."
सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्री सुद्धा वैतागले
मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले. मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री सुद्धा वैतागले होते, पोलिसांच्या भूमिकेबद्दल. राज्य सरकारचा पोलिसांना पाठिंबा होता असे नाही. स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घेतले, ते कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले. मी या शहराचा आमदार आहे. मी मंत्री आहे, माझ्याशी चर्चा करायला हवी होती. गृह खात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. पण, कुणाशीच चर्चा न करता पोलिसांनी हे निर्णय घेतले."
"ही काय गुंडगिरी आहे? मोर्चा काढत होते, काढू द्यायचा होता ना? रात्री बेरात्री अविनाश जाधव असू द्या किंवा कुणीही असू द्या. काय धरपकड करायची गरज आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. का म्हणून रात्री धरपकड करून वातावरण कलुषित केलं. पोलिसांचे हे चुकीचे आहे आणि पोलिसांवर कारवाई होणं गरजेचं आहे", अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली.