Breaking: Maharashtra Governor Invite NCP to form government? | राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले
राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी मोठे वळण घेतले आहे. शिवसेनेने वाढवून मागितलेली वेळ राज्यपालांनी नाकारल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, राज्यपालांनी सावध पवित्रा घेत तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

रात्री 8.30 वाजता राजभवनातून फोन आला. तुम्ही मला भेटायला या. आम्ही निघालो आहोत. त्यांनी कशासाठी बोलावले याबाबत मला माहिती नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेते राजभवनात जाणार आहेत. 


सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला होता. याबाबतचा संदेश त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला होता. त्याप्रमाणे शिवसेनेने राज्यपालांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ही मागणी फेटाळली आहे. मात्र, आता नवीन हालचाली घडताना दिसत आहेत. 


राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्याबाबत विचारणा केली असल्याने आणि आघाडी कायम असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकत्र राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शिवसेनेला आघाडीला पाठिंबा द्यावा लागणार आहे. 


दरम्यान, थोड्य़ाच वेळात राष्ट्रवादीचे नेते राजभवनावर जाणार असून राज्यपालांना भेटून चर्चा करणार आहेत. यामुळे शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेला दावा फोल ठरण्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादी सत्तास्थापनेचा दावा करतात की राज्यपालांचे निमंत्रण नाकारतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Breaking: Maharashtra Governor Invite NCP to form government?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.