भाजपा म्हणजे राष्ट्रवादीचा मुखवटा

By Admin | Updated: August 24, 2016 05:48 IST2016-08-24T05:48:29+5:302016-08-24T05:48:29+5:30

भाजपा शहराध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी वालचंद कॉलेजची ११० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न चालविला आहे.

BJP is the NCP's mask | भाजपा म्हणजे राष्ट्रवादीचा मुखवटा

भाजपा म्हणजे राष्ट्रवादीचा मुखवटा


मुंबई : पूर्वी राष्ट्रवादीत असणारे आणि आता सांगली भाजपा शहराध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी वालचंद कॉलेजची ११० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न चालविला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपा म्हणजे राष्ट्रवादीच्या लोकांचा मुखवटा असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
सांगलीत वालचंद कॉलेजच्या ११० एकर जमिनीवर पृथ्वीराज देशमुख यांचा डोळा आहे. राजकीय बळाचा वापर करून वालचंद कॉलेजचा कारभार ताब्यात घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. २४ मे रोजी देशमुख यांनी पुण्यात वालचंद कॉलेजच्या कार्यालयावर हल्ला करून बळजबरीने ट्रस्ट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे देशमुख अद्यापही मोकाट असल्याची टीका प्रीती मेनन यांनी केली. भाजपा नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी प्रीती मेनन यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता, मेनन म्हणाल्या की, ‘खडसे आणि खोतकर यांनी खरेच न्यायालयात दावा दाखल करायला हवा.’
जालना येथे अर्जुन खोतकर यांनी मैदानाची जागा बळकावून आपले कार्यालय थाटल्याच्या आरोपाचा मेनन यांनी या वेळी पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)
>शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रष्ट मंत्र्यांसमोर गुडघे टेकले आहेत. त्यांच्यात बाळासाहेबांसारखी हिंमत नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जालन्यात कार्यालयासाठी एक जागा मिळू शकत नाही का? मुलांच्या खेळाचे मैदान कार्यालयासाठी का बळकावले, असा सवालही त्यांनी केला.

Web Title: BJP is the NCP's mask