भाजप मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा; देऊळगावकरांकडे समन्वयाची जबाबदारी
By यदू जोशी | Updated: February 8, 2025 06:57 IST2025-02-08T06:55:48+5:302025-02-08T06:57:15+5:30
BJP Maharashtra News: भाजप पक्ष संघटना आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात समन्वय राखणे, संघ आणि पक्षसंघटनेची सरकारमधील कामे मार्गी लावणे, अशी जबाबदारी भारतीय यांच्यावर सोपविण्यात आली होती.

भाजप मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा; देऊळगावकरांकडे समन्वयाची जबाबदारी
-यदु जोशी
मुंबई : भाजप संघटना आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी अखेर प्रत्येक भाजप मंत्र्याकडे एकेक खासगी स्वीय सहायकाची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात श्रीकांत भारतीय यांची विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भाजप पक्ष संघटना आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात समन्वय राखणे, संघ आणि पक्षसंघटनेची सरकारमधील कामे मार्गी लावणे, अशी जबाबदारी भारतीय यांच्यावर सोपविण्यात आली होती. आता फडणवीस यांच्या नवीन कार्यकाळात प्रत्येक मंत्र्याकडे संघ व संघटनेसाठी एकेक पीए नेमण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात १३ स्वीय सहायकांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. हे सगळे खासगी व्यक्ती आहेत, संबंधित मंत्री पदावर असेपर्यंत त्यांचा पीए म्हणून कार्यकाळ असेल. मंत्र्यांकडील पीएसाठी असलेले वेतन आणि भत्ते त्यांना देण्यात येणार आहेत.
त्यातील काही जण रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेले आहेत पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वातील प्रदेश कार्यकारिणीत असलेल्या तीन पदाधिकाऱ्यांनी या निमित्ताने आपली माणसे मंत्र्यांकडे चिटकवली, अशी चर्चादेखील आहे.
देऊळगावकरांकडे समन्वय
चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, मेघना बोर्डीकर या तेरा मंत्र्यांकडे पीए नेमण्यात येत असल्याचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. या पीएंची सेवा कधीही समाप्त केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
पीए नेमण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी येथे पक्षाच्या अधिवेशनापूर्वी कार्यकारिणी बैठकीत केली होती. भाजपच्या अन्य मंत्र्यांकडेही असे पीए लवकरच नियुक्त करण्यात येणार आहेत. या सर्व पीएंशी समन्वय साधण्याची जबाबदारी सुधीर देऊळगावकर (समन्वयक सरकार व संघटना) यांच्यावर सोपविली आहे.
यांची नेमणूक
गणेश मेळावणे (चंद्रशेखर बावनकुळे), श्रीपाद ढेकणे (चंद्रकांत पाटील), ज्ञानेश्वर राक्षे (गिरीश महाजन), चेतन भोजकर (गणेश नाईक), मयूर पाटील (पंकजा मुंडे), प्रणय भोंदे (अतुल सावे), रवींद्र पाटील (अशोक उईके), मोहनिष जगताप (आशिष शेलार), निलेश अलाटे (शिवेंद्रराजे भोसले), राहुल महांगरे (जयकुमार गोरे), अमर कळमकर (संजय सावकारे), अतुल पवार (नितेश राणे), रवींद्र सासमकर (मेघना बोर्डीकर) यांची पीए म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.