काँग्रेसकडून भाजपा, शिवसेना, वंचितला मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:50 IST2026-03-16T18:49:52+5:302026-03-16T18:50:58+5:30
Congress News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे.

काँग्रेसकडून भाजपा, शिवसेना, वंचितला मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई - काँग्रेसने आज राज्यातील सत्ताधारी भाजपा, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे सचिव सचिन सावंत, माजी आमदार अनंत गाडगीळ, राजेश शर्मा, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे, प्रा. प्रकाश सोनावणे आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक विचार आणि राहुल गांधी यांचे आश्वासक नेतृत्व यावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला असून, काँग्रेसचा विचार हाच देशाचा विचार आहे. आज देशातील धर्मांध शक्तींचा मुकाबला फक्त काँग्रेसच करू शकतो म्हणून विविध विचारांचे, संघटनेचे लोक काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. काँग्रेसचा विचार हा बहुजनांचा, संविधानाचा, देशाचा, साधू संत, महापुरुषांचा विचार आहे, विश्वशांतीचा, विश्वबंधुत्वाचा विचार आहे, आणि तोच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र तोडा फोडा व राज्य करा हा विचार आहे, तो हिंदुत्वाचा विचार नाही तर संधीसाधूचा विचार आहे. एका हातात काँग्रेसचा विचार तर दुसऱ्या हातात कृती घेऊन संघर्षाची भूमिका घ्या व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यावेळी म्हणाले की, भाजपाचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. देशात आज धर्मांध विचाराचे विष पसरवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले जात आहे. आर्थिक विषमता वाढत चालली आहे, गरिबांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सरकार मुठभर लोकांसाठी काम करत आहे. शेतकरी, शेतमजूर, गरिब, वंचित यांच्यासाठी सरकार काम करत नाही. काँग्रेस जनतेपासून वेगळी नाही तर जनतेच्या भावनांशी एकरुप आहे. काँग्रेस मधून जे गेले ते सत्तेसाठी गेले आता आपल्याला पुढच्या पिढीसाठी लढायचे आहे असेही सावंत म्हणाले.