मुलांच्या किडनी निकाम्या करणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपची विक्री अन् वापरावर बंदी ! सिरपमध्ये विषारी घटक भेसळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:24 IST2025-10-06T13:24:00+5:302025-10-06T13:24:31+5:30
Nagpur : महाराष्ट्रासह आणखी सहा राज्यांत 'कोल्ड्रिफ'वर निर्बंध

Ban on sale and use of 'that' deadly cough syrup that damages children's kidneys! Syrup adulterated with toxic ingredients
नागपूर : कफ सिरपमध्ये विषारी घटक मिसळल्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात बालकांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रविवारी नागरिकांसाठी तातडीची धोक्याची सूचना जारी केली. 'कोल्ड्रिफ सिरप' नावाच्या औषधाची एक विशिष्ट बॅच वापरणे, विकणे, वितरित करणे तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले.
'कोल्ड्रिफ' या कफ सिरपमध्ये 'डायएथिलीन ग्लायकॉल' नावाचा विषारी घटक भेसळ करण्यात आल्याचा आरोप आहे. हा घटक मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे बालकांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे आणि मृत्यू ओढवण्याची शक्यता आहे.
याची दखल घेत 'एफडीए'चे आयुक्त डी. आर. गहाणे यांनी रविवारी धोक्याची सूचना देणारे पत्रक जारी केले. त्यात 'एसआर-१३' या बॅचच्या कोल्ड्रिफ सिरपची विक्री आणि वापर तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले. या बॅचचे कोल्ड्रिफ सीरप स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे जमा करण्याच्या सूचनाही दिल्या.
मार्केटमधील स्टॉक 'फ्रीज' करा
'कोल्ड्रिफ'ची उत्पादक कंपनी श्रीसन फार्मा तमिळनाडूत असल्याने, 'एफडीए' महाराष्ट्राचे अधिकारी तमिळनाडूच्या 'एफडीए' प्राधिकरणाशी समन्वय साधत आहेत. महाराष्ट्रातील वितरक, किरकोळ व घाऊक विक्रेते, रुग्णालये यांच्याकडे या बॅचचा स्टॉक उपलब्ध आहे का, याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपलब्ध स्टॉक तत्काळ 'फ्रीज' (गोठवून) ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
'ते' रसायन मृत्यूचे कारण
मध्य प्रदेश सरकारला तामिळनाडू सरकारकडून शनिवारी अहवाल मिळाला. त्यानुसार शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेल्या सिरपच्या नमुन्यात डायइथिलीन ग्लायकोल या रासायनिक पदार्थाचे ४८.६% प्रमाण आढळले आहे
हे रसायन किडनी निकामी होऊन मृत्यू होण्यास कारणीभूत ठरले असल्याचे अहवालात नमूद आहे.