आयुर्वेदिक औषधेही आता पेटंट मिळविण्याच्या दिशेने; दोनशे रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 07:59 AM2021-07-25T07:59:39+5:302021-07-25T08:00:14+5:30

कर्करोगावरील रेडिओ व केमोथेरपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी होणार मदत

Ayurvedic medicines are also now patented; Clinical trials on two hundred patients | आयुर्वेदिक औषधेही आता पेटंट मिळविण्याच्या दिशेने; दोनशे रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल

आयुर्वेदिक औषधेही आता पेटंट मिळविण्याच्या दिशेने; दोनशे रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल

googlenewsNext

अतुल कुलकर्णी

मुंबई : कर्करोगानंतर कराव्या लागणाऱ्या केमो आणि रेडिओ थेरपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ६ आणि राष्ट्रीय स्तरावर २ अशी ८ पेटंट भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टने सादर केली आहेत. त्यापैकी ५ पेटंट प्रकाशितही झाली आहेत. सहा महिने ते एक वर्षाच्या आत या पेटंटला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. 

पेटंट प्रकाशित होणे हा मान्यता मिळविण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा असतो, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी दिली. कर्करोगामध्ये केमो आणि रेडिओ थेरपीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणे, रुग्णाची जीवनशैली चांगली ठेवण्यासाठी यांचा उपयोग  होत असल्याचेही ते म्हणाले. केमोच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रवाळ पिष्टी तसेच सुवर्ण भस्म असणारे औषध, सुवर्णभस्मादि योग हे प्रतिकारशक्ती वाढवणारे, सूज कमी करण्यासाठीचे पद्मकादि घृत औषध, अनुवंशिक व जनुकीय संक्रमण झालेल्या स्तनांच्या कर्करोग रुग्णांसाठीचे औषध, तोंडाच्या कर्करोगामध्ये रेडिएशनमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे, ट्रिपल निगेटिव्ह, स्तनांच्या कर्करोगाच्या रुग्णाचा आजार नियंत्रणात आणणे व आयुर्मान वाढविण्यासाठीचे औषध, तोंडाच्या कर्करोगामध्ये केमो आणि रेडिओ थेरपीचा दुष्परिणाम दूर करण्यासाठीचे औषध यांचा या पेटंटमध्ये समावेश आहे.

उद्योगपती रतन टाटा यांची सेंटरला भेट 
दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाजवळ असणाऱ्या या सेंटरला प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी वाघोलीच्या केंद्रालाही भेट देऊन मोठे आर्थिक सहाय्य देऊ केले होते. पुण्यात झालेल्या ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेसाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी आयुर्वेदाच्या मदतीने सुरू असलेल्या उपचार पद्धतीचे कौतुक केले होते. पुण्याच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट सेंटरचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले असून, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने सेंट्रल ऑफ एक्सलन्स म्हणून या केंद्राला मान्यता देत अनुदानही देऊ केले आहे. आम्ही तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधांमुळे कर्करोगाच्या रुग्णांना केमोनंतर होणारे त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. भारतीय आयुर्वेद शास्त्र प्राचीन आहे. त्याचा उपयोग दुर्धर आजारावरील रुग्णांना व्हावा, या हेतूने हे संशोधन केल्याचे डॉ. सरदेशमुख यांनी सांगितले.

राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते दोन रिकव्हरी किटचे अनावरण
आठपैकी केमोथेरेपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणाऱ्या दोन केमो रिकव्हरी किट्सचे अनावरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच झाले असून सध्या ते रुग्णांसाठी वापरले जात आहे. आठ पेटंटसाठीच्या क्लिनिकल ट्रायल्स व प्रयोगशाळेतील तपासण्यांसाठी टाटा ट्रस्टने आर्थिक अनुदान दिले आहे. त्याशिवाय खारघर येथील टाटा कॅन्सर सेंटरचे संशोधन केंद्र, सह्याद्री रुग्णालय, पुणे, क्युरी कॅन्सर मानवता सेंटर, नाशिक, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे, इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशन ॲण्ड लॅबोरेटरी, पुणे या संस्थांनी देखील या कामात मोलाचे सहकार्य केले, असे डॉ. सरदेशमुख म्हणाले.

दोनशे रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल
आयुर्वेदामध्ये संशोधन होते, मात्र त्यासाठीच्या क्लिनिकल ट्रायल फारशा केल्या जात नाहीत. मात्र या सर्व पेटंटसाठी शंभर ते दोनशे रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आल्या आहेत. यासाठी इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट व रिसर्च सेंटरमधील सर्व कर्करोग तज्ज्ञ व कर्करोग संशोधकांच्या टीमचा सहभाग असल्याचे डॉ. विनिता देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Ayurvedic medicines are also now patented; Clinical trials on two hundred patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं