..अन् ते पाषाण झाले श्रद्धास्थान

By Admin | Updated: June 4, 2014 01:14 IST2014-06-04T01:14:51+5:302014-06-04T01:14:51+5:30

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ महामहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा मानव विकासाचा महामंत्र जगविख्यात आहे. परंतु या महामंत्रापूर्वी सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या अस्पृष्य

..and it became a stone worship | ..अन् ते पाषाण झाले श्रद्धास्थान

..अन् ते पाषाण झाले श्रद्धास्थान

दोन महामानवांची ऐतिहासिक भेट : डॉ. आंबेडकरांनी

आपल्या समाजाला दिला पंचसूत्री कार्यक्रम
 नागपूर : ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ महामहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा मानव विकासाचा  महामंत्र जगविख्यात आहे. परंतु या महामंत्रापूर्वी सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या अस्पृष्य समाजाला एक पंचसूत्री कार्यक्रम दिला  होता. एका दगडावर बसून त्यांनी समाजबांधवांना संबोधित करताना ते सूत्र सांगितले होते. सेवाग्राम वर्धा येथील त्या ऐतिहासिक  पाषाणाला आज श्रद्धेचे व पर्यटनाचे स्थान प्राप्त झाले आहे.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे १३ ऑक्टोबर १९३५ रोजी ‘मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू  म्हणून मरणार नाही’ असे म्हणत धर्मांंंंंतराची घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर देशभरात खळबळ माजली. या धर्मांंंंतरामुळे काही  विपरीत तर घडणार नाही, अशी तत्कालीन नेत्यांना भीती वाटू लागली. या पार्श्‍वभूमीवर डॉ. आंबेडकरांशी बोलावे, अशी विनंती  तत्कालीन नेत्यांनी महात्मा गांधीजींनी केली. महात्मा गांधी सेवाग्रामच्या आश्रमात थांबले होते. महात्मा गांधीजींचे निकटचे  सहकारी प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांनी पुढाकार घेऊन १ मे १९३६ रोजी डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची  भेट घडवून आणली. दोन महामानवांची ती ऐतिहासिक भेट होती. त्या भेटीत धर्मांंंंंतराच्या घोषणेसह देशातील इतर अनेक  विषयावंर चर्चा झाली. यावेळी माझ्यामुळे देशाला किंवा देशाच्या संस्कृतीला कुठलाही धक्का लागणार नाही, याबाबत डॉ.  आंबेडकरांनी महात्मा गांधींना आश्‍वस्त केले. त्यानंतर महात्मा गांधींनी या विषयावर कधीच चर्चा केली नाही. त्यानंतरचा  धर्मांंंंंतराचा इतिहास सर्वश्रुत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाग्रामला येणार याची माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने अस्पृष्य समाज सेवाग्राममध्ये दाखल  झाला होता. महात्मा गांधीजींसोबत तब्बल दीड तास चाललेल्या चर्चेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बापुकुटीतून बाहेर पडले.  तेव्हा बाहेर त्यांची वाट पाहात समाजबांधव उभे होते. समोरच विठ्ठल रुक्मिणीचे एक मंदिर होते. त्यासमोरील एका दगडावर ते  बसले. त्यांनी आपल्या समाजाशी संवाद साधला. तो संवाद केवळ खानापूर्ती नव्हता तर त्यांनी त्या संवादातून आपल्या अस्पृष्य  समाजाला विकासाचा एक पंचसूत्री कार्यक्रम दिला. मेलेल्या जणावरांना ओढणे बंद करा, शिक्षण घ्या, स्वच्छता बाळगा,  महारवतनदारी सोडा आणि मतभेदाचे झाड पोटात वाढू देऊ  नका, असा तो ऐतिहासिक पंचसूत्री कार्यक्रम होता. त्यावेळी या  संवादाचीही खूप चर्चा झाली होती.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा परिस्पर्श झालेल्या त्या पाषाणाला समाजबांधवांनी जपून ठेवले. आज तो परिसर एक श्रद्धास्थान  बनला आहे. सेवाग्रामला भेट देणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात. (प्रतिनिधी)

 

Web Title: ..and it became a stone worship