महाराष्ट्रातील शौकीन चोरटा, त्याने बारगर्ल गर्लफ्रेंडला तीन कोटींचा बंगला गिफ्ट दिला; अभिनेत्रीसोबत डेटसाठी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:18 IST2025-02-05T11:17:49+5:302025-02-05T11:18:15+5:30
एका घरफोडी प्रकरणात बंगळुरू पोलिसांनी या राष्ट्रीय स्तरावरील चोरट्याला अटक केली आहे.

महाराष्ट्रातील शौकीन चोरटा, त्याने बारगर्ल गर्लफ्रेंडला तीन कोटींचा बंगला गिफ्ट दिला; अभिनेत्रीसोबत डेटसाठी...
महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या एका अट्टल चोरट्याने चोरीच्या पैशांतून अभिनेत्री असलेल्या गर्लफ्रेंडला तीन कोटींचा बंगला गिफ्ट दिला असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका घरफोडी प्रकरणात बंगळुरू पोलिसांनी या राष्ट्रीय स्तरावरील चोरट्याला अटक केली आहे. यानंतर त्याचे रेकॉर्ड पाहिले तेव्हा पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.
या चोराचे नाव पंचाक्षरी संगय्या स्वामी असे आहे. तो सोलापूरचा राहणारा आहे. त्याने देशभरात विविध ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. यातून जमलेल्या पैशांतून त्याने फिल्म इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीला करोडो रुपयांचे घर घेऊन दिले आहे.
स्वामीने कराटेमध्ये ब्लॅकबेल्ट मिळविलेला आहे. त्याने १५ वर्षांचा असताना पहिली चोरी केली होती. २००३ मध्ये त्याने लॅपटॉप चोरला होता, यानंतर त्याने चोरी कधीच सोडली नाही. त्याने आतापर्यंत महाराष्ट्र, आंध्र, तेलंगाना, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत सुमारे २०० घरफोड्या केल्या आहेत. ९ जानेवारीला त्याने बंगळुरूतील एका उद्योजकाच्या घरात चोरी केली. तेथून त्याने १२ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. चोरट्याला शोधण्यासाठी पोलिसांनी २०० च्या वर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व तसेच ८ दिवसांच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तपासानंतर स्वामीला १९ जानेवारीला पकडले.
स्वामी हा चोरीसाठी पुढे आणि मागे दरवाजे असलेली घरे निवडायचा. त्याला चोरीच्या गुन्ह्यात यापूर्वीही अटक आणि शिक्षाही झालेली आहे. त्याने गुजरातमध्ये पाच वर्षांची शिक्षाही भोगली आहे. तसेच मुंबई पोलिसांनीही त्याला पकडले होते, परंतू तो पुढील वर्षी जामिनावर सुटला होता. स्वामीने आसामच्या महिलेशी लग्न केले आहे, त्याला एक मुलगाही आहे. परंतू, त्यांना सोडून तो चोरी आणि त्या पैशांतून एका अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरण करत होता. आधी बारडान्सर असलेल्या या अभिनेत्रीला त्याने २०१६ मध्येच पश्चिम बंगालमध्ये तीन कोटींचे घर बांधून दिले आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातून तिच्या बंगल्यामध्ये ठेवण्यासाठी २२ लाखांचे अक्वेरिअमही तो ट्रकने घेऊन गेला आहे.
या स्वामीने अन्य एका अभिनेत्रीशी डेटसाठी १५ लाख रुपये मोजले होते. तसेच एका दिवसासाठी तिच्यासोबत राहण्यासाठी हॉटेलमध्ये ६ लाख रुपये खर्च केले होते. पोलिसांनी अशा या चोऱ्या करून मौजमजा करणाऱ्या हाय प्रोफाईल चोराला पकडले आहे.