एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:36 IST2025-11-20T17:36:02+5:302025-11-20T17:36:53+5:30
विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच नव्हे, तर आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनाही पक्षात घेऊन महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवण्याचे भाजपा धोरण निवडणुकांपूर्वी सत्ताधारी महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण करत आहे.

एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
मागील काही दिवसांपासून महायुतीमधील नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीतील अंतर्गत धुसफूस वाढल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच नव्हे, तर आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनाही पक्षात घेऊन महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवण्याचे भाजपा धोरण निवडणुकांपूर्वी सत्ताधारी महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण करत आहे. शिवसेनेतील मंत्र्यांनी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आणि अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान, काल (बुधवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या नाराजीनंतरही भाजपा नेतृत्व भाजपा प्रदेशच्या पाठीशी असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी दिली आहे. केंद्रीय नेतृ्त्व भाजपा प्रदेशच्या पाठिशी आहे. आरोप-प्रत्यारोप होतच राहतील तुम्ही पक्ष बांधणीचे काम सुरूच ठेवा, अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात भाजपाची घोडदौड चांगल्या पद्धतीने ठेवा असे सांगण्यात आले आहे. शिंदेंच्या नाराजी नाट्यानंतरही केंद्रीय नेतृत्व भापज प्रदेशच्या पाठिशी असल्याचे पाहायला मिळत आहे.
'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला सोबत ठेवा मात्र भाजपा या पक्षाची घोडदौड कायम सुरू ठेवायची आहे, असे स्पष्ट आदेश केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती समोर आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये वाद होत असल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली होती. निवडणुका महायुती म्हणून लढण्याचे ठरले आहे. पण, ऐनवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपाने केल्याचे शिंदेंनी शाह यांना सांगितले. भाजपाच्या वरिष्ठांनी निर्णय न घेतल्यास निवडणुकीत फटका बसेल, अशी भीतीही शिंदे यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.