शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:14 IST2025-11-20T14:14:20+5:302025-11-20T14:14:20+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: एनडीएची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते भेटत असतात, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
BJP Chandrashekhar Bawankule News: शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली. दिल्ली भेटीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ५० मिनिटे चर्चा केली. तसेच आपली भूमिका आणि नाराजी त्यांच्यासमोर मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपाकडून शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकारी आणि नेते पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिंदेसेनेकडून करण्यात आला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी असा प्रकार सुरू असल्याने शिंदेसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले.
ते नाराज असल्याची बातम्या कपोलकल्पित
एकनाथ शिंदे यांना परवा भेटलो होतो, ते नाराज नव्हते. त्यानंतर ते अमित शाह यांना भेटले. नगर विकास खाते तसेच केंद्र सरकार सोबतच्या समन्वयाचे विषय यासाठी एनडीएचे नेता म्हणून त्यांनी भेट घेतली. एनडीएची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते भेटत असतात. ते नाराज असल्याची बातम्या कपोलकल्पित आहे. महाराष्ट्रात महायुती ५१ टक्के मतांनी विजयी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी भेट घेतली होती, तीच त्यांची भूमिका आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माझ्या कामठी मतदारसंघातूनही भाजपाचे पदाधिकारी शिंदे यांच्या पक्षात गेले आहे. सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांतर सुरू आहे. त्यामुळे कुठेही महायुतीत गडबड झाली आहे अशी स्थिती नाही. समन्वय समितीमध्ये ठरवले आहे की, एकमेकांच्या पक्षातील पक्षप्रवेश करायचे नाही. मात्र जेव्हा काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही, तेव्हा कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.