गांधी कुटुंबावर खोटे आरोप करणारे गुलाम नबी आजाद कृतघ्न, नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 04:32 PM2022-08-30T16:32:53+5:302022-08-30T16:36:39+5:30

आझाद व तथाकथीत जी २३ नेते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर कटकारस्थाने करत असल्याचा पटोले यांचा आरोप.

Allegation of Ghulam Nabi Azad ungrateful falsely accused Gandhi family congress leader nana patole | गांधी कुटुंबावर खोटे आरोप करणारे गुलाम नबी आजाद कृतघ्न, नाना पटोलेंचा आरोप

गांधी कुटुंबावर खोटे आरोप करणारे गुलाम नबी आजाद कृतघ्न, नाना पटोलेंचा आरोप

Next

"काँग्रेस पक्षाने ज्या नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मान, सन्मान दिला परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून स्वार्थापोटी हे लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. गांधी कुटुंबाने या नेत्यांना सर्व महत्त्वाची पदे दिली. पण आज त्याच गांधी कुटुंबाविरोधात चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. गुलाम नबी आझाद यांनाही पक्षाने व गांधी कुटुंबाने ५० वर्षात सर्व महत्त्वाची पदे दिली. परंतु आझाद व तथाकथीत जी २३ नेते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर कटकारस्थाने करत आहेत," असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रशिक्षण व प्रबोधन समितीच्या वतीने नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरास भेट देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. "मी खासदारकीचा राजीनामा देताच दुसऱ्या दिवशी माझ्या बंगल्याचे वीज, पाणी कनेक्शन कापले होते. पण गुलाम नबी आजाद हे  कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना दिल्लीत त्यांचा सरकारी बंगला व सोयी सुविधा अजूनही कायम आहेत. ते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर काँग्रेसला बदनाम करत आहेत. देशात आज गंभीर परिस्थिती आहे, सीमेवर चीनच्या कारवाया वाढलेल्या आहेत, संविधान धोक्यात आहे अशावेळी भाजपाला प्रश्न विचारण्याऐवजी हे नेते काँग्रेस पक्षालाच बदनाम करण्याचे काम करत आहेत," असे पटोले म्हणाले.

"कर्जाचा बोजा टाकून विकास कसला?"
"भाजपा देशभरात हायवेचे जाळे पसरवल्याचा डंका पिटत आहे पण त्यासाठी काढलेल्या कर्जाच्या व्याजापोटी दर महिन्याला ४४ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. जनतेवर एवढा मोठा कर्जाचा बोझा टाकून विकास कसला करता. मुंबई- गोवा महामार्ग १२ वर्षांपासून रखडलेला आहे, खड्डे बुजवण्याचे आदेश दिले तरी ते बुजवले जात नाहीत. या खड्ड्याने अपघात होऊन लोकांचे जीव जात आहेत. कारण भाजप सरकारमधील लोकच या रस्त्यांचे ठेकेदार आहेत, त्यांना फक्त मलिदा खायचा आहे. देशभरातील हायवे असो वा समृद्धी महामार्ग असो यात किती पाप लपले आहे हे येणाऱ्या काळात समजलेच," असंही ते म्हणाले.

"देशात अनेक गंभीर समस्या"
देशात आज अनेक गंभीर समस्या आहेत, महागाई, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, संविधान उद्ध्वस्त करण्याचे काम केले जात आहे. देशाच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि केंद्रातील सरकार या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्रातील सरकारचे हे अपयश जनेपर्यंत पोहचवण्यासाठी, लोकांपर्यंत वास्तव पोहचावे यासाठी काँग्रेस पक्षाने शिबिरांचे आयोजन केले आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाचा पर्दाफाश करणे ही या प्रशिक्षणामागची संकल्पना आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. तसेच तरुणांना काँग्रेस पक्षासी जोडण्याचा प्रयत्नही असल्याचे पटोले यांनी नमूद केले.

Web Title: Allegation of Ghulam Nabi Azad ungrateful falsely accused Gandhi family congress leader nana patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.