About 77 percent of parents are serious about the burden of the school bags | दप्तराच्या ओझ्याबाबत ७७ टक्के पालक गंभीर
दप्तराच्या ओझ्याबाबत ७७ टक्के पालक गंभीर

ठळक मुद्देदप्तराच्या ओझ्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे समिती स्थापन आठवड्याभरापूर्वी आपला अभ्यासपूर्ण अहवाल शासनाकडे सादर

पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे स्थापन केलेल्या समितीच्या सर्वेक्षणात ७७ टक्के पालकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच ८४.९ टक्के विद्यार्थी शाळेत उपलब्ध करून दिलेल्या पाण्याऐवजी घरातूनच पाणी बॉटल आणणे पसंत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठीवर शासनाने नियम तयार करून निश्चित केलेल्या वजनापेक्षा २ ते ३ किलो अधिक वजन दप्तर शाळेत घेऊन जावे लागत असल्याचे समोर आले आहे. 
दप्तराच्या ओझ्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे स्थापन केलेल्या समितीने आठवड्याभरापूर्वी आपला अभ्यासपूर्ण अहवाल शासनाकडे सादर केला. या अभ्यासपूर्ण अहवालाच्या आधारे देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून धोरण ठरविले जाणार आहे. त्यासाठी देशातील ३५२ शाळा, २ हजार ९९२ पालक, ३ हजार ६२४ विद्यार्थ्यांना या समितीतर्फे प्रश्नावली दिली होती. त्यातून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे बहुतांश शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अद्याप पाऊल उचलले नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या पाठीवर १ ते ५ किलो वजनाचे दप्तर असल्याचे दिसून आले. दप्तरामध्ये ३.५ किलो वजनाची शालेय पुस्तके, २.५ किलो वजनाच्या वह्या, १ किलोचा जेवणाचा डबा, एक किलोची पाण्याची बॉटल असल्याचे दिसून आले. सर्वेक्षणात ९१ टक्के विद्यार्थी वेळापत्रकानुसार वर्गात पुस्तके घेऊन जातात. वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी ७६.३ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांना लॉकर उपलब्ध करून दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत वजनदार दप्तर आणू नये याबाबत सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले जाते.
.....
‘त्या’ गोष्टींचा अभ्यास करणार 
आमच्या पाल्यांना दप्तराच्या ओझ्याचा त्रास होत असल्याचे ७७ टक्के पालकांनी समितीला कळविले आहे. विद्यार्थ्यांना शाळेकडून पुस्तकाचे दोन संच उपलब्ध करून दिल्यास दप्तराचे ओझे कमी होऊ शकते. मात्र, ८६.४ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे दोन संच दिलेले नाहीत. त्याचप्रमाणे ७७ टक्के विद्यार्थी जेवणाचा डबा, ६३ टक्के विद्यार्थी पाण्याची बॉटल, ३.२ टक्के विद्यार्थी ‘स्पोर्ट किट’ व ०.६ टक्के विद्यार्थी शाळेत खेळणी घेऊन जात असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार कमी करण्यासाठी शाळेशी निगडित असलेल्या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे, असे अहवालावरून दिसून येते.

Web Title: About 77 percent of parents are serious about the burden of the school bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.