ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:10 IST2025-11-20T11:08:56+5:302025-11-20T11:10:21+5:30
शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह या २ महिला उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे

ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
जळगाव - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील शिंदेसेना-भाजपातच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येते. जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी भाजपाचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला धक्का दिला आहे. महाजनांच्या या खेळीमुळे जामनेरमध्ये भाजपाचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी भाजपासमोर आव्हान उभे केले होते. परंतु याच उमेदवारांना अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश करण्यासाठी गिरीश महाजनांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.
जामनेर नगरपालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेचे उमेदवार आमनेसामने आले होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून वार्ड क्रमांक १ मध्ये मयुरी चव्हाण आणि वार्ड नंबर १३ मधून रेशंता सोनवणे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला होता. याठिकाणी वार्ड क्रमांक १ मध्ये सपना झाल्टे आणि वार्ड १३ मधून किलुबाई शेवाळे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या वार्डात भाजपा-शिंदेसेना समोरासमोर आले होते. मात्र मतदानापूर्वीच गिरीश महाजनांनी मोठी खेळी करत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांना अर्ज मागे घेत त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यास यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह या २ महिला उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भाजपाच्या सपना झाल्टे, किलुबाई शेवाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी २ भाजपा नगरसेवक बिनविरोध झाले आहेत.
एकनाथ शिंदेंची नाराजी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेचे काही माजी नगरसेवक भाजपात सामील झाले. या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटले. शिंदे वगळता इतर मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली होती. यापुढे महायुतीत एकमेकांचे नेते फोडले जाणार नाहीत. परंतु जळगाव जामनेर येथे गिरीश महाजनांनी उपजिल्हाप्रमुखांसह शिंदेसेनेच्या २ महिला उमेदवारांनाच निवडणुकीतून माघार घ्यायला लावत भाजपात प्रवेश दिला आहे.