तिरूपतीचे देवदर्शन ठरले अखेरचे; रेल्वेखाली चिरडून बसचालकाचा मृत्यू
By राजकुमार जोंधळे | Updated: May 18, 2026 08:47 IST2026-05-18T08:47:21+5:302026-05-18T08:47:32+5:30
राजकुमार जाेंधळे निलंगा (जि. लातूर) : तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन गावाकडे परतताना पाण्यासाठी रेल्वेतून उतरले. मात्र, तोल गेल्याने रेल्वेखाली ...

तिरूपतीचे देवदर्शन ठरले अखेरचे; रेल्वेखाली चिरडून बसचालकाचा मृत्यू
राजकुमार जाेंधळे
निलंगा (जि. लातूर) : तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन गावाकडे परतताना पाण्यासाठी रेल्वेतून उतरले. मात्र, तोल गेल्याने रेल्वेखाली चिरडून निलंगा आगाराच्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे गौर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
निलंगा तालुक्यातील गौर येथील चंद्रकांत आप्पाराव देशमुख (४२) हे निलंगा आगारात बसचालक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या गावातील दोन मित्रांसह तीन दिवसांपूर्वी तिरूपती येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तिरूपती-विकाराबाद रेल्वेने गावी परतत होते. दरम्यान, रेणुगुंठा रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली असता, चंद्रकांत देशमुख हे पिण्याच्या पाण्याची बाटली आणण्यासाठी उतरले. पाणी घेऊन परत येताना तोल गेल्याने पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, चंद्रकांत देशमुख हे आपल्या डब्यात परत न आल्याने सोबतच्या मित्रांनी शोध घेण्यास सुरुवात केली. रेल्वे पुढे हुमनाबाद स्थानकावर पोहोचल्यानंतर चंद्रकांत देशमुख यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मित्रांना फोन आला. त्या फोनद्वारे तुमच्या मित्राचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती समजली. त्यांनी तातडीने पुन्हा घटनास्थळाकडे धाव घेतली.
चंद्रकांत देशमुख हे निलंगा आगारात गेल्या काही वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. ते शांत, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून परिचित होते. या घटनेमुळे गौर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.