खेळता खेळता काळाचा घाला; पाण्याच्या हौदात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
By राजकुमार जोंधळे | Updated: May 18, 2026 08:45 IST2026-05-18T08:44:57+5:302026-05-18T08:45:13+5:30
लातूरमधील बोधे नगर येथील हृदयद्रावक घटना

खेळता खेळता काळाचा घाला; पाण्याच्या हौदात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
राजकुमार जाेंधळे
लातूर : शहरातील बोधे नगर परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. घराबाहेर खेळत असताना पाण्याच्या हौदात पडून दोन लहान मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दिव्या नवनाथ उबाळे (वय ६) आणि कार्तिक भरत कांबळे (वय ७) अशी मृत पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बोधे नगर परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बोधे नगर भागातील रामला इंडस्ट्रिजच्या पाठीमागील परिसरात पाणी विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या एक विक्रेत्याने टँकर भरण्यासाठी एक मोठा हौद तयार केला आहे. रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिव्या आणि कार्तिक हे दोन्ही चिमुकले या परिसरात नेहमीप्रमाणे खेळत होते. खेळता खेळता त्यांचा अंदाज चुकल्याने ते या हौदात कोसळले. त्यात पाणी असल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
नागरिकांची धाव; पण...
मुले पाण्यात पडल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून दोघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केले. ही बातमी समजताच शासकीय रुग्णालय परिसर आणि बोधे नगर भागात नातेवाइकांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.