लातुरात गुटखा तस्करावर छापा; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला केले अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: April 17, 2026 05:38 IST2026-04-17T05:38:04+5:302026-04-17T05:38:37+5:30
Latur Crime News: गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात लातूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून एका संशयित कारवर छापा मारला. ज्यात ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातुरात गुटखा तस्करावर छापा; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला केले अटक
- राजकुमार जाेंधळे
लातूर - गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात लातूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून एका संशयित कारवर छापा मारला. ज्यात ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील मजगे नगर ते एका इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामसमोर गुरुवारी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल आनंद हाल्लाळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी येथे पाळत ठेवली होती. या कारवाईत नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर) याला ताब्यात घेतले आहे. तो आपल्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारमधून (एम.एच. ०९ सी.व्ही. ९१२४) प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करत होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये पान मसाला २० बॅग (किंमत १ लाख २४ हजार ८०० रुपये), तंबाखू २० बॅग (किंमत ३१ हजार २०० रुपये) आणि कार (किंमत ७ लाख रुपये) असा एकूण ८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक जी.डी. चित्ते हे करत आहेत.