लातुरात ॲल्युमिनियम कारखान्याला भीषण आग, एकाचा मृत्यू, दाेघे जखमी
By राजकुमार जोंधळे | Updated: April 16, 2026 22:00 IST2026-04-16T21:59:47+5:302026-04-16T22:00:07+5:30
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

लातुरात ॲल्युमिनियम कारखान्याला भीषण आग, एकाचा मृत्यू, दाेघे जखमी
राजकुमार जाेंधळे / लातूर
लातूर : येथील जुन्या एमआयडीसीत मुंदडा ॲल्युमिनियम कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, दाेघे गंभीर भाजले आहेत. या घटनेत दत्ता बुरांगे (वय २५, रा. प्रकाशनगर, लातूर) या तरुणाचा मृत्यू झाला असून, अभीकुमार (मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्यासह अन्य एक गंभीर जखमी झाला़. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या २५ ते ३० कर्मचाऱ्यांसह सहा वाहने जवळपास तीन तासांपासून शर्थीचे प्रयत्न करीत होते. दरम्यान, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास काहीअंशी आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले. लातूर येथील जुन्या एमआयडीसीत मुंदडा ॲल्युमिनियम कारखाना असून, या कारखान्यात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. बघता...बघता आगीने रौद्ररुप धारण केले. संपूर्ण एमआयडीसी परिसरात धुराचे लोट पसरले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल २५ ते ३० कर्मचाऱ्यांसह सहा वाहने पाणी भरून घटनास्थळी दाखल झाले. आग एवढी भीषण होती की, कर्मचाऱ्यांना जवळ जाणेही कठीण झाले. धुराचे लोट वाढल्याने बंबाद्वारे दूरवरूनच पाण्याचे फवारे सुरू होते.
गॅस सिलिंडरचा स्फोट?
कंपनीत लागलेल्या आगीत एका गॅस सिलिंडरचाही स्फोट झाल्याचे सांगण्यात येत होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी भरलेले अनेक गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यातील काही सिलिंडर लिकेज झाल्याचेही घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले.