लातूर : नागपूरहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसला सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. लातूर शहराजवळ असलेल्या औसा रोडवरील वासनगाव शिवारात, हॉटेल तुलसीसमोर ही दुर्घटना घडली. सुदैवाने, बसचालकाने दाखविलेले कमालीचे प्रसंगावधान आणि मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व ३५ प्रवाशांना त्यांच्या साहित्यासह सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रॅव्हल्स बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे.
एका खाजगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एम.एच. ३८-एक्स-८०५३) नागपूरहून कोल्हापूरकडे जात होती. पहाटे ३ वाजेच्या सुमारास बस लातूर शहराजवळील औसा रोडवर आली असता, गाडीत शॉर्टसर्किट झाल्याची शंका चालकाच्या लक्षात आली. चालकाने त्वरित प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली.
प्रवाशांना सुखरूप काढले बाहेर; दुचाकीस्वारांचीही मदत..!
गाडी थांबवताच चालकाने तातडीने हालचाल करत बसमधील सर्व प्रवाशांना जागे केले आणि त्यांच्या सामानासह सुरक्षितपणे खाली उतरवले. याच दरम्यान, बसच्या पाठीमागून मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने '११२' या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. तिथून तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
ट्रॅव्हल्स जळून खाक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह !
अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या भीषण आगीत बसचे टायर, काचा, आतील खुर्च्या आणि कुशन पूर्णपणे जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुदैवाने एकही प्रवासी जखमी झाला नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे खाजगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गाड्यांची वेळेच्या वेळी तांत्रिक तपासणी होते का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
ट्रॅव्हल्सच्या प्रवासी क्षमतेची तपासणी करा
लातूर शहरातून आणि महामार्गावरून दररोज शेकडो खाजगी ट्रॅव्हल्स ये-जा करत असतात. परिवहन विभागाने या सर्व ट्रॅव्हल्सच्या प्रवासी क्षमतेची आणि तांत्रिक सुरक्षिततेची कसून तपासणी करावी, अशी जोरदार मागणी आता प्रवाशांमधून आणि नागरिकांमधून केली जात आहे. या बसला नेमकी आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Web Summary : A Nagpur-Kolhapur bus caught fire near Latur, but quick thinking by the driver and helpful motorcyclists ensured all 35 passengers escaped unharmed. The bus was completely destroyed. Safety concerns regarding private travels have been raised.
Web Summary : लातूर के पास नागपुर-कोल्हापुर बस में आग लग गई, लेकिन ड्राइवर और मददगार मोटरसाइकिल सवारों की त्वरित सोच से सभी 35 यात्री सुरक्षित बच गए। बस पूरी तरह से जल गई। निजी यात्राओं की सुरक्षा को लेकर चिंता जताई गई है।