अखेर सोनखेड बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:48+5:302021-06-10T04:14:48+5:30

निलंगा तालुक्यातील तेरणा नदीवर औराद, तगरखेडा, वांजरखेडा, गुंजरगा, लिंबाळा, मदनसुरी, किल्लारी, सोनखेड आदी बंधारे आहेत. यापैकी सोनखेड व वांजरखेडा ...

Finally, the work of Sonkhed dam is nearing completion | अखेर सोनखेड बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाकडे

अखेर सोनखेड बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाकडे

निलंगा तालुक्यातील तेरणा नदीवर औराद, तगरखेडा, वांजरखेडा, गुंजरगा, लिंबाळा, मदनसुरी, किल्लारी, सोनखेड आदी बंधारे आहेत. यापैकी सोनखेड व वांजरखेडा हे दोन बंधारे कोल्हापुरी पद्धतीचे आहेत. सोनखेड येथील कोल्हापुरी पाटबंधारेचे रूपांतर उच्चस्तरीय बंधाऱ्यात रूपांतरित करण्याचे काम गेल्या वर्षी हाती घेण्यात आले होते. काम अर्धवट राहिले त्यातच पाऊस जास्त झाला. परिणामी, तेरणा नदीला पूर आला. त्यामुळे जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दारे स्वयंचलित नसल्याकारणाने वर उचलता आलेली नव्हती. परिणामी, पुराच्या पाण्याने २०० मीटर लांब व २० मीटर रुंद असा नदीचा प्रवाह शेतकऱ्यांच्या शेतातून तयार होऊन अनेक एकर जमिनीची माती वाहून गेली हाेती. यात शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पाण्यावर तरंगत वाहून गेल्या होत्या. गेल्यावर्षी झालेला पुराचा हाहाकार पुन्हा यावर्षी होऊ नये. म्हणून या बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची पाहणी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जलसिंचन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित जगताप यांनी केली. संबंधित बांधकाम विभागाला काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याप्रमाणे सदरील काम हे झपाट्याने पूर्णत्वाकडे सुरू आहे. यावर्षी या बंधाऱ्याची स्वयंचलित दारे उघडता व बंद करता येणार आहे. या बंधाऱ्यात पाणीसाठा होणार असून यात सोनखेड, चांदोरी, येळणुर, गुंजरगा या गावातील शेत शिवारातील २०९ हेक्टर जमीन क्षेत्र हे बारमाही सिंचनाखाली येणार असून याचा लाभ शेतीला होणार आहे, असे शाखा अभियंता एस.आर. मुळे यांनी सांगितले.

तेरणेवरील सातही बंधाऱ्यात अल्प पाणीसाठा...

औराद ७ टक्के, तगरखेडा १.५ टक्के, मदनसुरी ५ टक्के, गुंजारगा १३ टक्के तर निंबाळा, वांजरखेडा आणि तेरणा नदीवरील सातही उच्चस्तरीय बंधाऱ्यात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिना सुरू झाला असून मृग नक्षत्र निघाले आहे. अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. एकमेव वांजरखेडा कोल्हापुरी पाटबंधारा हा उच्चस्तरीय बंधाऱ्यात रूपांतरित करण्याचा शिल्लक आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे कामही लवकर करण्यात यावे, अशी मागणी तगरखेडा, हालसी, वांजरखेडा या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Finally, the work of Sonkhed dam is nearing completion