भारनियमनाव्यतिरिक्त जळकोटात सातत्याने विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:20 AM2021-09-25T04:20:07+5:302021-09-25T04:20:07+5:30

जळकोट : विद्युत ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने तालुक्यातील माळहिप्परगा येथे २२० केव्ही वीज केंद्र सुरू केले आहे; परंतु हे केंद्र ...

Apart from load shedding, there is continuous power outage in Jalkot | भारनियमनाव्यतिरिक्त जळकोटात सातत्याने विजेचा लपंडाव सुरूच

भारनियमनाव्यतिरिक्त जळकोटात सातत्याने विजेचा लपंडाव सुरूच

Next

जळकोट : विद्युत ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने तालुक्यातील माळहिप्परगा येथे २२० केव्ही वीज केंद्र सुरू केले आहे; परंतु हे केंद्र असूनही त्याचा फारसा लाभ तालुक्यातील नागरिकांना होत नाही. विशेष म्हणजे, भारनियमनाव्यतिरिक्त सातत्याने वीज गुल होत आहे, तसेच विहिरीवरील विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, त्यांना विजेसंदर्भातील अडचणी येऊ नयेत म्हणून तत्कालिन युती सरकारने माळहिप्परगा येथे २२० केव्ही वीज केंद्र उभारले. त्यासाठी दीडशे कोटींचा खर्च करण्यात आला होता. या केंद्रामुळे तालुक्यास सुरळीत वीज पुरवठा होईल, अशी आशा ग्राहकांना होती; मात्र ती फोल ठरली आहे. भारनियमनाव्यतिरिक्त सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विहिरीवरील विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, हे केंद्र सुरू होण्यापूर्वीसारखी स्थिती निर्माण झाली आहे.

वास्तविक पहाता, या केंद्रावरून वीज पुरवठा हा तालुक्यात व्यवस्थित होण्याऐवजी तो उदगीरला व अन्य ठिकाणी होतो. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या केंद्रावरून सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी तालुक्यात आणखीन दोन ठिकाणी उपकेंद्र उभारणे गरजेचे ठरत आहे. त्यामुळे येथील शेतकरी व कारखानदारांना त्याचा लाभ होणार आहे.

जळकोट तालुक्यात आणखीन दोन नवीन उपकेंद्र उभारण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, सरपंच राजेश केंद्रे, सरपंच संध्या रमेश चोले, पाटोदाच्या सरपंच वनमाला गुट्टे, सरपंच सत्यवान पाटील, नगरसेवक शिवानंद देशमुख, महेश धुळशेट्टे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील आगलावे, साहेबराव पाटील येवले, सरपंच चंद्रशेखर पाटील, दाऊद बिरादार, आयुब शेख, माजी उपसरपंच सत्यवान पांडे, सत्यवान दळवे, दत्ता पवार, बालाजी पवार, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबिडे, बाजार समितीचे संचालक दिलीप कांबळे, विठ्ठल चव्हाण, गजानन दळवे यांनी केली आहे.

माळहिप्परग्याचे केंद्र नावालाच...

तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी माळहिप्परगा येथे २२० केव्ही वीज केंद्र उभारण्यात आले आहे; परंतु या केंद्रातून सुरळीत व व्यवस्थित वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी सातत्याने मागणी होत आहे. सध्या सातत्याने वीज गुल होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Web Title: Apart from load shedding, there is continuous power outage in Jalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.