कोल्हापूर जिल्ह्याला 'यलो अलर्ट'; पावसाची रिपरिप सुरु असल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ, राधानगरीचे दोन दरवाजे खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:58 IST2025-08-30T13:57:26+5:302025-08-30T13:58:32+5:30

२४ बंधारे पाण्याखाली

Yellow alert for Kolhapur district Dam water storage increases as rains resume two gates of Radhanagari open | कोल्हापूर जिल्ह्याला 'यलो अलर्ट'; पावसाची रिपरिप सुरु असल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ, राधानगरीचे दोन दरवाजे खुले

कोल्हापूर जिल्ह्याला 'यलो अलर्ट'; पावसाची रिपरिप सुरु असल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ, राधानगरीचे दोन दरवाजे खुले

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस होता. धरण क्षेत्रातही पाऊस वाढल्याने धरणातील विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने त्यातून प्रतिसेकंद ४३५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पातळी २२.०९ फुटांवर असून २४ बंधारे पाण्याखाली आहेत.

गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सकाळपासून पाऊस जरा अधिक राहिला. कोल्हापूर शहरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. ग्रामीण भागात मात्र पाऊस अधिक राहिला. हवामान विभागाने शुक्रवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यात रिपरिप सुरू आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस काहीसा वाढल्याने सर्वच धरणांतील विसर्ग वाढला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ४३५६, वारणातून ४८५२ तर दूधगंगेतून ४६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी वाढत असून धरणातील विसर्ग पाहता नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यात पावसाची रिपरिप असली तरी हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. दिवसभर थंड वारे जाेरात वाहत असल्याने गारठा वाढला आहे.

आजपासून यलो अलर्ट

आज, शनिवारी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील. घाटमाथ्यावर मात्र मुसळधार होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

पडझडीत ३.६५ लाखांचे नुकसान

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर ८ खासगी मालमत्तांची पडझड होऊन त्यामध्ये ३ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Web Title: Yellow alert for Kolhapur district Dam water storage increases as rains resume two gates of Radhanagari open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.