आंतरधर्मीय लग्नातील साक्षीदार मौलवीस मारहाण, कोल्हापुरातील घटना; काही काळ तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:05 IST2025-06-19T12:03:24+5:302025-06-19T12:05:39+5:30

माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मौलवीस ताब्यात घेतले

Witness in interfaith marriage beaten up by cleric in Kolhapur | आंतरधर्मीय लग्नातील साक्षीदार मौलवीस मारहाण, कोल्हापुरातील घटना; काही काळ तणाव

आंतरधर्मीय लग्नातील साक्षीदार मौलवीस मारहाण, कोल्हापुरातील घटना; काही काळ तणाव

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील तरुण आणि आटपाडी (जि. सांगली) येथील तरुणीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केला असून, त्या विवाहासाठी रजिस्टर कार्यालयात साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलेल्या मौलवीस मुलीच्या नातेवाइकांनी मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि. १८) दुपारी शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ घडला. यावेळी तरुणांची गर्दी झाल्याने परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटपाडी येथील तरुणी आणि जयसिंगपूर येथील तरुणाने १५ दिवसांपूर्वी कोल्हापुरात रजिस्टर लग्न केले. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. लग्नासाठी कोल्हापुरातील एक मौलवी साक्षीदार होते, अशी माहिती तरुणीच्या नातेवाइकांना मिळाली होती. 

त्यानुसार तरुणीचा भाऊ काही तरुणांसह शुक्रवार पेठेतील मौलवीच्या घरी पोहोचला. त्याने जाब विचारत मौलवीस मारहाण केली. ११२ कॉलवरून याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मौलवीस ताब्यात घेतले. चौकशीअंती संबंधित लग्न सहमतीने झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला सोडून दिले.

Web Title: Witness in interfaith marriage beaten up by cleric in Kolhapur