आता तरी चिकोडी जिल्हा होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:51+5:302021-02-05T06:52:51+5:30

निपाणी : दादा जनवाडे बेळगाव जिल्ह्यात एकाच वेळी ४ मंत्रिपदे मिळाली असून यामुळे राज्यात चिकोडी विभागाची राजकीय ताकद वाढीस ...

Will it be Chikodi district now? | आता तरी चिकोडी जिल्हा होणार का?

आता तरी चिकोडी जिल्हा होणार का?

निपाणी : दादा जनवाडे

बेळगाव जिल्ह्यात एकाच वेळी ४ मंत्रिपदे मिळाली असून यामुळे राज्यात चिकोडी विभागाची राजकीय ताकद वाढीस लागली आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करावी ही मागणी दोन दशकांपासून आहे. आता एकाच वेळी लक्ष्मण सवदी, शशिकला जोल्ले, उमेश कती व श्रीमंत पाटील यांच्याकडे महत्त्वाची मंत्रिपदे आहेत. यामुळे आता तरी चिकोडी जिल्हा होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

१९९७ साली तत्कालीन मुख्यंमत्री जे एच पटेल यांनी चिकोडी जिल्ह्याची घोषणा केली होती; पण २४ तासांत चिकोडी जिल्हा घोषणा रद्द करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत चिकोडी जिल्हा मागणीसाठी येथील जनता सर्व प्रकारची लढाई लढत आहे. त्यावेळी राजकीय ताकद कमी पडल्याने जिल्हा निर्मिती रद्द झाली; पण आता उपमुख्यमंत्र्यासह अन्य महत्त्वाची ३ खाती चिकोडी विभागात असल्याने नागरिकांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

चिकोडी जिल्हा घोषणा ही राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने लांबणीवर पडलेली बाब आहे. घोषणा होऊन पुन्हा 24 तासांत ती रद्द करण्याची घटना दुर्मीळच आहे. चिकोडी जिल्हा घोषणा रद्द झाल्यानंतर आजतागायत येथील जनता लढाई लढत आहेत. बेळगाव जिल्ह्यत एकूण १४ तालुके तर १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. बेळगाव जिल्हा हा अतिशय मोठा असून विभाजन होणे अपेक्षित आहे.

राजकीय इच्छाशक्ती गरजेची

चिकोडी विभागात सध्या लक्ष्मण सवदी हे उपमुख्यमंत्री तर निपाणीच्या आ. शशिकला जोलले महिला बालकल्याणमंत्री आहेत. कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते आहे. उमेश कत्ती यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद आहे. खासदार म्हणून अण्णासाहेब जोलले दिल्लीत गेले आहेत तर विधान परिषदेवर महानतेश कवटगीमठ व विवेकराव पाटील काम करत आहेत. तर एकूण 8 आमदार चिकोडी विभागात आहेत. त्यामुळे या सर्वांनी मनावर घेतल्यास जिल्ह्याची घोषणा होऊ शकते.

Web Title: Will it be Chikodi district now?