शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले..?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अजब प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:20 IST2025-05-03T12:19:02+5:302025-05-03T12:20:46+5:30
मुद्दाला दिली सोयीस्कर बगल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले..?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अजब प्रश्न
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते, मी दिले होते का? मी तर दिलेले नाही, असे अजब उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत कर्जमाफीच्या मुद्याला बगल दिली. लाडक्या बहिणींसह सर्वच योजनांचे पैसे देणार असून, राज्य सरकारने त्याची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांचा राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यातर्फे शुक्रवारी अडकूर (ता. चंदगड) येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु आता सत्ता आल्यानंतर सरकार त्याबाबत बोलायला तयार नाही.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लाडक्या बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तातडीने नियोजन केले आहे. सर्वच योजनांचे पैसे देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
पालकमंत्रिपदावरून काय अडले?
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पालकमंत्री नाही म्हणून काही अडले आहे का ? सर्व कामे होत आहेत, कोण काय बोललं याबद्दल मला विचारू नका, असं म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.