Kolhapur: गोव्याला फिरायला गेले अन् दारू घेऊन आले; पलूसमधील सख्ख्या चुलत भावांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:19 IST2025-10-07T13:18:20+5:302025-10-07T13:19:21+5:30
यातील एकाचे वडील महसूल खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती

Kolhapur: गोव्याला फिरायला गेले अन् दारू घेऊन आले; पलूसमधील सख्ख्या चुलत भावांना अटक
कोल्हापूर : गोव्यात मौजमजा करून परत येताना ५० हजारांची दारू घेऊन आलेल्या दोघा सख्ख्या चुलत भावांना पोलिसांनी सापळा लावून पकडले. नवीन वाशी नाका येथे केलेल्या कारवाईत शुभम शिवकुमार साळुंखे (वय २८) आणि आशितोष हिंदुराव साळुंखे (२७, दोघे रा. आंधळी रोड, पलूस, जि. सांगली) यांच्याकडून पोलिसांनीगोवा बनावटीची ५० हजारांची दारू जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलदार योगेश गोसावी यांना भोगावतीमार्गे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने शनिवारी (दि. ४) रात्री नवीन वाशी नाका येथे सापळा रचला.
संशयास्पद कार अडवून तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या दारूचे १२ बॉक्स सापडले. ५० हजार रुपयांची दारू आणि सात लाखांची कार असा साडेसात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अटकेतील शुभम साळुंखे आणि आशितोष साळुंखे यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बार चालकांना विक्रीचे नियोजन
कारमध्ये लपवून आणलेली दारू पलूस परिसरातील बीअरबार चालकांना विकण्याचे नियोजन साळुंखे बंधूंनी केले होते. पहिल्याच प्रयत्नात ते पोलिसांच्या हाती लागले. यातील एकाचे वडील महसूल खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.