Kolhapur: वारणा नदीच्या पाण्याने गाठला तळ, पाणीटंचाईने शेतकरी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:01 IST2025-11-26T12:59:24+5:302025-11-26T13:01:04+5:30
शेती उत्पादनावर परिणाम होणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली

Kolhapur: वारणा नदीच्या पाण्याने गाठला तळ, पाणीटंचाईने शेतकरी हैराण
खोची : ऐन हिवाळ्यात वारणा नदीच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना कृषी व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. नदीच्या पाण्याचा गारठा सोडाच पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. बंधारे व पूर संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गेली आठ-दहा दिवस झाले शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
माणगाव (ता. शाहुवाडी), तांदूळवाडी, शिगाव (ता. वाळवा) येथील कोल्हापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तर उखळू (ता. शाहुवाडी, करंगुली (ता. शिराळा) कणेगाव (ता. वाळवा) येथे पूर संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे जोरदार प्रवाहाने वाहणारे पाणी थांबले आहे. गेले आठ-दहा दिवस झाले पाणी पातळी एकदमच तळापर्यंत पोहचली आहे. नदीचा पृष्ठभाग दिसू लागला आहे.
शेकडो शेतकऱ्यांच्या कृषी सिंचनाच्या मोटारी तसेच गाव पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी सुद्धा उघड्या पडल्या आहे. अनेक ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्याचे तसेच गाव पाणीपुरवठा याचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतीला पाणी देण्याचा फेर वाढला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
दरम्यान एक हजार क्युसेकने पाणी सोडले असून उद्या पर्यंत खोची बंधाऱ्यापर्यंत नदीचे पाणी भरपूर येईल अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली.