पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 12:02 IST2025-08-25T12:01:42+5:302025-08-25T12:02:26+5:30

उद्यापासून पुन्हा 'मघा'चा पाऊस, चार दिवस राहणार सक्रिय

Water level of Panchgange drops by three and a half feet 164 citizens displaced in Kolhapur district | पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच

पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची प्रामुख्याने उघडीप राहिली. अधूनमधून जोरदार सरीही कोसळत होत्या, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी आहे. परिणामी नद्यांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी साडेतीन फुटांनी कमी झाली असून अद्याप ३१ बंधारे पाण्याखाली आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी,. भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४ मिली मीटर पावसाची नोंद झाली असली तरी घाटमाथ्यावरील तालुक्यात अधिक पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १५००, वारणातून १६३० तर दूधगंगा धरणातून ३१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी ओसरु लागले असून ३३ फुटांपर्यंत पातळी खाली आली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ९ खासगी मालमत्तांची पडझड होऊन २ लाख ५५ हजारांचे नुकसान झाले आहे.

एसटीची वाहतूक सुरळीत

गेल्या पाच-सहा दिवसांपासून पुराच्या पाण्यामुळे अनेक बंधारे व रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचा सर्वाधिक फटका एसटी विभागाला बसला आहे. मात्र, रविवारी एसटीची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

३९ मार्ग अद्याप पाण्याखाली

जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग १० तर ग्रामीण मार्ग २९ असे ३९ मार्ग पुराच्या पाण्याखाली आहेत. या मार्गावरील वाहतूक अद्याप विस्कळीत आहे.

अद्याप १६४ नागरिक स्थलांतरितच

पाऊस उघडला असला तरी इचलकरंजी परिसरातील गावातील ५६ कुटुंबातील १६४ नागरिक व ११६ जनावरे स्थलांतरितच आहेत.

उद्यापासून पुन्हा 'मघा'चा पाऊस, चार दिवस राहणार सक्रिय

संथगतीने पडणारा आणि दुसऱ्या तसेच शेवटच्या टप्प्यातील 'मघा' नक्षत्रातील पाऊस उद्या, मंगळवार, दि.२६ ऑगस्ट ते शुक्रवार दि. २९ ऑगस्ट म्हणजे हरतालिका ते ऋषीपंचमी या चार दिवसांत सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून काहीसाच सक्रिय होऊन, मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषतः हा पाऊस कोकणासह सह्याद्रीच्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता, सह्याद्रीच्या कुशीतील जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून नद्या आणि कालवे पात्रात अगोदरच ओव्हरफ्लो होत असलेला पूर-पाणी विसर्ग असाच टिकून राहू शकतो, असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Water level of Panchgange drops by three and a half feet 164 citizens displaced in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.