Kolhapur-TET Paper leak case: दोघा म्होरक्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी, १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:42 IST2025-11-26T12:42:34+5:302025-11-26T12:42:44+5:30
‘मास्टरमाइंड’ गायब, या प्रकरणाचे बिहार-पाटणापर्यंत धागेदोरे गेले

Kolhapur-TET Paper leak case: दोघा म्होरक्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी, १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
मुरगूड : सोनगे येथील टीईटी पेपरफुटी प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपीकडून पोलीस तपासात या प्रकरणाचे बिहार-पाटणापर्यंत धागेदोरे गेले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील अटकेत असलेला मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याला २९ नोव्हेंबर तर राहुल पाटीलला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. तर अटकेत असणाऱ्या अन्य १६ जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली.
याप्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीकडून पोलिसांनी कसून तपास केला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. टीईटी आणि सेटच्या पेपर फोडण्याच्या या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर पोहोचले असून, या प्रकरणाशी संबंधित आरोपी बिहार पाटण्याचे असल्याचे उघडकीस तपासात पुढे आले आहे.
त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासयंत्रणा गतिमान केली आहे. या प्रकरणाची वाढती व्याप्ती पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अटकेत असणाऱ्या आरोपीकडून अधिक माहिती घेतली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांच्याकडे सोपविली आहे.
महेश गायकवाड आणि राहुल पाटील या दोघांची ही अकॅडमी असून त्यांच्या माध्यमातून या अगोदर अशा घटना घडल्या असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोघांनाही पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांच्याकडील तपासातून अजून सविस्तर माहिती पुढे येणार आहे.
या प्रकरणातील अमोल पांडुरंग जरग (वय ३८, रा. सरवडे, ता. राधानगरी, सध्या रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर कोल्हापूर), स्वप्निल शंकर पोवार,(वय ३५, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), संदीप भगवान गायकवाड (वय ४६, रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा), रणधीर तुकाराम शेवाळे (वय ४६, रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा),
तेजस दीपक मुळीक (वय २२, रा. निमसोड, ता. कडेगाव, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (वय ३२, रा. खोजेवाडी, जि. सातारा), संदीप शिवाजी चव्हाण (वय ४०, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड, जि. सातारा), श्रीकांत नथुराम चव्हाण (वय ४३, रा. विद्यानगर कराड, सध्या रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा), गुरुनाथ गणपती चव्हाण (वय ३८, रा. राधानगर),
नागेश दिलीप शेंडगे (वय ३०, रा. सावर्डे पाटण, ता. राधानगर), रोहित पांडुरंग सांवत (वय ३५, रा. कासारपुतळे), अभिजित विष्णू पाटील (वय ४०, रा. बोरवडे, ता. कागल), अक्षय नामदेव कुंभार (वय २७, रा. सोनगे, ता. कागल) तर भावी शिक्षक दत्तात्रय आनंदा चव्हाण (वय ३२, रा. कासारपुतळे), किरण सातापा बरकाळे (वय ३०, रा. ढेंगेवाडी, सर्व ता. राधानगर), दयानंद भैरू साळवी (वय ४१, रा. तम नाकवाडा, ता. कागल) या १६ जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या सर्व सोळा जणांची कळंबा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात ‘मास्टरमाइंड’ गायब
टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार महेश गायकवाडला अटक करून कारवाईला सुरुवात केली असली तरी या प्रकरणाचा खरा ‘मास्टरमाइंड’ बेपत्ता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या व्यक्तीला जाणीवपूर्वक वाचवले जात आहे का? असा संशय अधिक गडद होत आहे. मुख्य मास्टरमाइंड कागल तालुक्यातील असल्याचीच चर्चा आहे.
पेपर फोडण्यासाठी सोनगे हेच ठिकाण निवडण्यात आले, यामागे काही विशेष संबंध होते का? मास्टरमाइंडचा या गावाशी निकटचा संबंध असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे पेपरफोडीचा संपूर्ण कट सोनगेमध्ये बसवण्यात आला होता का, याच्या अगोदर या ठिकाणी किंवा दुसऱ्या जवळच्या ठिकाणी असा प्रकार या अगोदर झाला होता का, अशी शंका बळावली आहे.
शैक्षणिक विभाग आणि सरकारी भरती प्रक्रियेत अनेकांना भूलथापा देत मोठी ‘माया’ कमावणारा हा मास्टरमाइंड पूर्वीपासूनच सराईत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्याला या प्रकरणातून काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सरळ प्रश्न उपस्थित केला जात आहे. अटक केलेल्या आरोपीच्या नातेवाइकांना ही पोलिस स्टेशनमध्ये सरळ सरळ भेटण्यासाठी सोडले जात होते.