Kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गावर शिरोली येथे तिहेरी अपघात; एक ठार, १६ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 14:29 IST2025-05-24T14:28:43+5:302025-05-24T14:29:05+5:30
कंटेनरला भरधाव ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक, ट्रॅव्हल्सला कार धडकली

Kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गावर शिरोली येथे तिहेरी अपघात; एक ठार, १६ जण जखमी
सतीश पाटील
शिरोली : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी येथील मेनन पिस्टनच्या शेजारी मालवाहतूक कंटेनरला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली. यात ट्रॅव्हल्स मधील क्लिनर रोहन कुलकर्णी (वय ३० रा. खडकलाट, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) जागीच ठार झाला. तर ट्रॅव्हल्समधील १६ प्रवासी जखमी झाले.
दरम्यानच ट्रॅव्हल्सला मागील कारची धडक झाली. आज, शनिवारी सकाळच्या सुमारास हा तिहेरी अपघात झाला. अपघातातील जखमींवर सीपीआर रुग्णालय तसेच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक अशी, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुणे-निगडी येथून ३५ प्रवाशांना घेऊन खासगी बस बेळगावच्या दिशेने निघाली होती. दरम्यान शिरोली येथे पुण्याहून बेंगळुरुच्या दिशेने चाललेल्या मालवाहतूक कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली. याचवेळी ट्रॅव्हल्सच्या पाठीमागे असलेल्या कारने ट्रॅव्हल्सला धडक दिली. या तिहेरी अपघातात ट्रॅव्हल्समधील क्लीनर (वाहक) रोहन कुलकर्णी हा जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल्स मधील १६ प्रवासी गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी ७ रुग्णवाहिका दाखल, वाहतूक विस्कळीत
अपघातात ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केला. अपघाताची माहिती मिळताच शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र, महामार्ग रुग्णवाहिका, किणी आणि सीपीआर येथील अशा ७ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जखमींना सीपीआर आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. यातील काहींची अवस्था गंभीर आहे.
शिरोली पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले होते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.