रुद्राक्ष विक्रीसाठी आले अन् चंदन चोरले; कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरात चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:04 IST2025-01-31T12:04:33+5:302025-01-31T12:04:53+5:30
उत्तर प्रदेशच्या चोरट्यांना कर्नाटकातून अटक

रुद्राक्ष विक्रीसाठी आले अन् चंदन चोरले; कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरात चोरी
कोल्हापूर : कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालय परिसरातून २० हजार रुपये किमतीच्या चंदनाचे झाड लंपास करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना पोलिसांनी कर्नाटकातील रायबाग येथून अटक केली. करण उर्फ समुसलाल सरायलाल पवार उर्फ पारधी (वय ५५) आणि रूलबाबू सरायलाल पवार उर्फ पारधी (२०, दोघे रा. हरदुवा, जि. कटणी, मध्य प्रदेश) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २९) ही कारवाई केली.
जिल्हा न्यायसंकुल परिसरातून २० ते २१ जानेवारीदरम्यान एका चंदनाच्या झाडाची चोरी झाली होती. याबाबत न्यायालयातील शिपाई चेतन तानाजी जाधव यांनी फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार अमित सर्जे आणि महेश खोत यांना संशयितांची माहिती मिळाली. रुद्राक्ष विक्रीसाठी न्यायालय परिसरात आलेल्या दोघांनी चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचे समजताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात दोन्ही चोरटे स्पष्ट दिसत होते.
फुटेजवरून शोध घेतला असता दोघे कर्नाटकातील रायबाग येथे असल्याची माहिती मिळाली. रायबागला जाऊन पथकाने दोघांना अटक केली. अधिक तपासात त्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला.
रेकी करून चोरी
रुद्राक्ष विक्रीच्या निमित्ताने फिरणारे चोरटे चंदनाच्या झाडांची पाहणी करतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी झाड तोडून ते लंपास करतात. अटकेतील संशयितानी चोरलेल्या लाकडाची विक्री केली असून, खरेदीदाराचे नाव पोलिसांना मिळाले आहे. लवकरच त्यालाही ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बंदोबस्तावरील तीन पोलिसांचे निलंबन
जिल्हा न्याय संकुल परिसरात बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या तीन पोलिसांनी कामात हलगर्जीपणा केल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सहायक फौजदार जकरिया नूरमहंमद इनामदार, पोलिस नाईक संतोष हरी पाटील आणि पोलिस शिपाई विजयकुमार मारुती जाधव, अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. त्यांची नियुक्ती पोलिस मुख्यालयात होती. न्याय संकुल परिसरात कर्तव्यावर असताना त्यांनी कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आल्याने बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.