कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी तत्कालीन लेखाधिकाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:38 IST2025-07-10T17:38:02+5:302025-07-10T17:38:21+5:30
शालेय पोषण आहार योजनेची रक्कम स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग करण्याऐवजी स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या खात्यावर २८ लाख रुपये वर्ग केली

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी तत्कालीन लेखाधिकाऱ्यास अटक
कोल्हापूर : शालेय पोषण आहार योजनेची रक्कम स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग करण्याऐवजी स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या खात्यावर २८ लाख ८९ हजार रुपये वर्ग करून अपहार केल्याचा आरोप असलेला तत्कालीन लेखाधिकारी दीपक बाळासाहेब माने (वय ४४) याला बुधवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. माने जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागात ‘शालेय पोषण’कडे लेखाधिकारी म्हणून कार्यरत होता.
पोलिसांनी सांगितले की, सन २०२१ ते २०२४ या कालावधीत २८ लाख ८९ हजारांची रक्कम डेटा एंट्री ऑपरेटर तेजस्विनी साठे यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या खात्यावर वर्ग केली होती. या प्रकरणी दीपक माने या लेखाधिकाऱ्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल दिला होता. यामध्ये साठे दोषी आढळल्या. माने याच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता.
शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन आठजणांना अटक केली होती. माने फरार होता. त्याला शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी अटक केली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या माने याचे लोकसभा निवडणुकीदरम्यान अपहरण करून त्याला धमकी देण्यात आली होती. या प्रकरणातही राजारामपुरी पोलिसांनी आठजणांना अटक केली होती.