Kolhapur: जळालेल्या अस्थी आढळल्या; पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर बेपत्ता की घातपात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:05 IST2026-01-12T12:05:28+5:302026-01-12T12:05:44+5:30
फॉरेन्सिक अहवालातून पुढील तपासाची दिशा ठरणार

Kolhapur: जळालेल्या अस्थी आढळल्या; पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर बेपत्ता की घातपात?
गारगोटी: पाटगाव (ता.भुदरगड) येथील माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर (वय ५२) हे बुधवार (दि. ७) पासून बेपत्ता झाले होते. पाटगाव गावालगत कुलकर्णी नावाच्या शेताजवळ त्यांचे वाहन आढळले होते. याचठिकाणी काही अंतरावर जळालेल्या अवस्थेत काही अस्थी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
महेश पिळणकर गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असून भुदरगड पोलीस व स्थानिक नागरिक त्यांचा कसून शोध घेत होते. गुरुवारी पाटगाव गावालगत कुलकर्णी नावाच्या शेताजवळ त्यांचे वाहन मिळून आले होते. रविवारी सकाळी त्याच परिसरात गुराख्याला जळालेल्या अवस्थेत काही अस्थी आढळून आल्या. याची माहिती पोलिस पाटील अरविंद देसाई यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने ही बाब भुदरगड पोलिसांना कळवली.
घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, भुदरगड पोलिस निरीक्षक गोरख चौधर यांनी घटनास्थळी भेट दिली. वनहद्दीतील ओढ्याशेजारी झुडपात जळालेल्या अवस्थेत काही अस्थी आढळून आल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅब, ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
अस्थी अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्या आहेत. या अस्थी मानवाच्या आहेत की प्राण्याच्या हे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाल्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरणार असल्याचे पोलिस अधीक्षक गोरख चौधर यांनी सांगितले.