कोल्हापुरातील पाचगाव केंद्र शाळेची इमारत पावसाने ढासळली, रात्रीच्या घटनेने अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:26 IST2025-09-03T13:26:15+5:302025-09-03T13:26:30+5:30
पाच वर्षांपासूनचे निर्लेखन प्रस्ताव प्रशासनाकडे धूळखात पडून

कोल्हापुरातील पाचगाव केंद्र शाळेची इमारत पावसाने ढासळली, रात्रीच्या घटनेने अनर्थ टळला
पाचगाव : येथील केंद्र शाळेची इमारत पावसाने ढासळली असून फार मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि.१) रात्री दहा वाजता घडल्यामुळे जीवितहानी टळली.
पाचगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेची पटसंख्या १७८ इतकी असून सध्या या शाळेत केवळ ४ शिक्षकांवर अध्यापन सुरू आहे. या शाळेच्या इमारतीचे नवीन बांधकाम करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडेशाळा निर्लेखनाचे प्रस्ताव धूळखात पडले आहेत.
मुलांची बैठक व्यवस्था दुसरीकडे करा
केंद्र शाळा पाचगावच्या जुन्या इमारतीच्या भिंती सततच्या पावसाने ढासळल्या. त्यामुळे मुलांच्या बैठक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. इमारतीच्या इतर भिंतीही पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासन अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन ढासळणाऱ्या भिंती यंत्रणेकडून बाजूला कराव्यात आणि मुलांची बैठक व्यवस्था चांगल्या ठिकाणी कशी होईल याचे नियोजन करावे, अशी पालक वर्गातून मागणी होत आहे.
या शाळेचे स्ट्रक्चर ऑडिट करून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांना भेटून हा प्रस्ताव दिला होता. मात्र, प्रशासनाकडून प्रत्येकवेळी त्रुटी काढून पळवाट काढली जात आहे. शाळा सुरू असताना जर या भिंती पडल्या असत्या तर त्याची जबाबदारी कोणाची? या प्रश्नाचे उत्तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने द्यावे. - संग्राम पाटील, माजी सरपंच, पाचगाव.