Nagpur-Ratnagiri Highway: अंकली-चोकाक रस्त्यासाठी महिनाअखेरपर्यंत मूल्यांकन, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:52 IST2026-02-18T13:51:31+5:302026-02-18T13:52:10+5:30
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाहूवाडी येथे महामार्गाची पाहणी करून दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील कामे मेअखेर पूर्ण करण्याची सूचना केली

संग्रहित छाया
कोल्हापूर : नागपूर- रत्नागिरीमहामार्गांतर्गत येत असलेल्या अंकली ते चोकाक या रस्त्यासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनासाठीचे मूल्यांकन महिनाअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर चौपट मोबदल्याच्या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम वर्ग केली जाणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाहूवाडी येथे महामार्गाची पाहणी करून दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील कामे मेअखेर पूर्ण करण्याची सूचना केली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नागपूर- रत्नागिरी महामार्ग कोल्हापुरातून जात आहे. पहिला टप्पा रत्नागिरी ते आंब्यापर्यंतचा आहे. पुढे आंबा ते पैजारवाडी, पैजारवाडी ते चोकाक आणि चोकाक ते अंकली, असे तीन फेज कोल्हापुरात होत असून, त्यासाठी लागणाऱ्या सर्व जमिनींचे संपादन पूर्ण झाले आहे. आंबा ते पैजारवाडी येथील काम ७१ टक्के, तर पैजारवाडी ते चोकाक इथपर्यंतचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. या दोन्ही फेजमधील महामार्गाच्या कामाची गती वाढवून ते मेअखेर संपवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
चोकाक ते अंकली येथील बाधितांच्या मागणीनुसार राज्य शासनाने चारपट मोबदला देण्याचे मान्य केल्याने तेथील जमिनींची मोजणीदेखील पूर्ण झाली आहे. सध्या त्यांचे मूल्यांकन सुरू असून, महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच बाधित खातेदारांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम वर्ग केली जाणार आहे.
दृष्टिक्षेपात महामार्ग
चोकाक ते अंकली हा महामार्ग ३३ किलोमीटरचा असून, यात चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर, उमळवाड, उदगाव व अंकली, अशी दहा गावे या महामार्गावर येतात. चौपट मोबदल्यासाठी आंदोलनामुळे महामार्गाचे काम रखडले होते. बाधित शेतकऱ्यांना चौपट दर मिळणार असल्याने महामार्गाच्या कामाला गती येणार आहे. महामार्गावर ९३७ बाधित शेतकरी असून, जवळपास ६३ हेक्टर जमीन भूसंपादन होणार आहे. यामध्ये ५१४ बाधित गट आहेत.