Kolhapur Crime: जीपीएस यंत्रणेत बिंग फुटले, शंभर कोटीच्या जीएसटी चोरीचा साजिदच मास्टर माइंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:12 IST2025-05-24T12:12:13+5:302025-05-24T12:12:40+5:30

साहित्याची वाहतूक कागदावरच

The accused Sajid Ahmed Sheikh is the mastermind behind GST evasion of around Rs 100 crore by submitting purchase and sale invoices of bogus companies | Kolhapur Crime: जीपीएस यंत्रणेत बिंग फुटले, शंभर कोटीच्या जीएसटी चोरीचा साजिदच मास्टर माइंड

Kolhapur Crime: जीपीएस यंत्रणेत बिंग फुटले, शंभर कोटीच्या जीएसटी चोरीचा साजिदच मास्टर माइंड

कोल्हापूर : बोगस कंपन्यांची खरेदी-विक्रीची बिले सादर करून त्याद्वारे सुमारे १०० कोटी रुपयांची वस्तू व सेवा विक्रीकर (जीएसटी) चोरी करणारा आरोपी साजिद अहमद शेख (वय ४६, रा. सोलापूर) हाच मास्टर माइंड ठरला आहे. बनावट ई-वे बिलाच्या तपासणीत साहित्याची कोठेही वाहतूक झाली नसल्याचे जीपीएस यंत्रणेत उघड झाले आणि त्याचे बिंग फुटले. तीस कंपन्यांची फसवणुकीतील आकडा शंभर कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. सध्या तो तपासात दिशाभूल करत आहे.

केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने गुरुवारी त्याला अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीनुसार त्याची शुक्रवारी कळंबा कारागृहात रवानगी झाली. आरोपी साजिद हा उच्चशिक्षित आहे. त्याचे सोलापुरात कार्यालय असून त्याच्याकडे सात कर्मचारी आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्याने कर चोरीचा प्लॅन तयार केला. त्यात टेम्पो ड्रायव्हर, स्क्रॅप व्यावसायिक, मेडिकल दुकानवाले, छोटे-मोठे सिमेंट विक्रेत्यांचा वापर केला.

त्यासाठी त्याने ३० बनावट कंपन्या सुरू करून बँक खाती उघडली. त्याचा नावाचा वापर तो स्वत: करत होता. लाॅगीन आयडी आणि पासवर्ड स्वत:कडे ठेवून त्यांच्याकडून ओटीपी मागवून सर्व व्यवहार केला. व्यवहार झाल्याच्या खोट्या पावत्या जीएसटी विभागाकडे सादर करत होता. कोणतीही वस्तू किंवा सेवा न देता त्याने सरकारला गंडा घातल्याचे स्पष्ट होत आहे. कार्यालयात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना तो काही रक्कम देत असल्याचे प्राथमिक तपासात उघड होत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणालाही संशय येऊ नये, म्हणून दहाहून अधिक कंपन्या अधिकृतपणे स्थापन केल्या. त्यातूनही त्याचे व्यवहार सुरू होते. तर बनावट कंपनीच्या माध्यमातून तो सिमेंट आणि सळी खरेदी विक्रीचे कागदोपत्री व्यवहार दाखवत होता. त्याची बिले जीएसटी विभागाकडे सादर करून त्यावरील रिटर्न्स कराचा लाभ घेत होता. प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे करचोरी केल्याचे उघड होत आहे.

अधिकाऱ्यांकडून कसून तपास

केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे, गुप्तचर अधिकारी वरुण सिंग, अतुलकुमार जैस्वाल, अविनाश सूर्यवंशी यांच्याकडून आरोपी साजिद याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, तो प्राथमिक तपासात दिशाभूल करत आहे. अन्य १२ कंपन्यांचे मालक, संचालकांचे जबाबाची नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

असा सापडला जाळ्यात

केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाकडून करचोरीच्या संशयावरून सोलापूर येथील कार्यालयावर छापा टाकला. त्याने सादर केेलेली ई-वे बिलाची तपासणी केली. दिलेल्या बिलानुसार जीपीएसच्या माध्यमातून मालाची वाहतुकीच्या तपासणीत वाहतूक कागदावर झाल्याचे स्पष्ट झाले. अत्याधुनिक डाटा विश्लेषण आणि तांत्रिक साधने वापरून तपास केला. त्यातून १२ कंपन्यांची चौकशीत बनावट बिलांचे बिंग फुटले. इतर १८ कंपनीतून कर चोरीची रक्कम ही १०० कोटींहून अधिक असल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The accused Sajid Ahmed Sheikh is the mastermind behind GST evasion of around Rs 100 crore by submitting purchase and sale invoices of bogus companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.