करवीर पंचायत सभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:20+5:302021-02-05T06:52:20+5:30

: सभापती धोत्रेंचा आज राजीनामा रमेश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : नेत्यांनी ठरवून दिलेला सव्वा वर्षाचा कार्यकाल ...

Taluka's focus on election of Karveer Panchayat Chairman | करवीर पंचायत सभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष

करवीर पंचायत सभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष

: सभापती धोत्रेंचा आज राजीनामा

रमेश पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा बावडा : नेत्यांनी ठरवून दिलेला सव्वा वर्षाचा कार्यकाल संपला असल्याने करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कृष्णा धोत्रे या आज, सोमवारी (दि. १) सकाळी ११ वाजता जि. प. अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा देणार आहेत. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा तालुक्यात रंगली होती. आता नवीन सभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या मीनाक्षी भगवान पाटील (कळंबा) व मंगल आनंदराव पाटील (नेर्ली) या दोघींपैकी एकीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

करवीर पंचायत समितीवर पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील गटाची सत्ता आहे. एकूण २२ सदस्यांपैकी १४ सदस्य हे काँग्रेसचे आहेत. त्यापैकी सतेज पाटील गटाचे ७ व पी. एन. पाटील गटाचे ७ आहेत. याशिवाय शिवसेना ४, भाजप ३ व राष्ट्रवादी १ असे एकूण २२ सदस्य आहेत.

पंचायतवर सतेज पाटील व पी. एन. पाटील गटाची सत्ता असल्याने एका गटाला सभापती, तर दुसऱ्या गटाला उपसभापती पदाची संधी दिली जाते. तसेच सव्वा-सव्वा वर्षाचा पदाचा कालावधी ठरविला जातो. सध्या आमदार पी. एन. पाटील गटाच्या अश्विनी धोत्रे सभापती, तर पालकमंत्री सतेज पाटील गटाचे सुनील पोवार उपसभापती आहेत. या दोघांचा एक कार्यकाल आता संपला आहे.

सध्या पंचायतमध्ये अडीच वर्षांसाठी महिलांसाठी जनरल आरक्षण आहे. त्यातील सव्वा वर्षाचा कालावधी आता संपला आहे. आता पालकमंत्री सतेज पाटील गटाकडे सभापतिपद येणार आहे. त्यामुळे उर्वरित सव्वा वर्षासाठी मीनाक्षी पाटील व मंगल पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. कालावधी सव्वा वर्षाचा असल्याने या दोघींना सहा - सहा महिन्यांसाठी संधी मिळणार असल्याचे समजते. मात्र, पहिली संधी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, सभापती निवडीनंतर आठ ते दहा दिवसांनी उपसभापती पदाची निवड होणार आहे. पी. एन. पाटील गटाचे अविनाश पाटील, सविता पाटील, अर्चना खाडे व नेताजी पाटील या चौघांपैकी एकास उपसभापती पदाची संधी मिळणार आहे. .............................................

Web Title: Taluka's focus on election of Karveer Panchayat Chairman