उपनिरीक्षक पालवेंसह तिघांवर गुन्हा

By Admin | Updated: August 2, 2015 01:24 IST2015-08-02T01:24:20+5:302015-08-02T01:24:20+5:30

कामगारांना अमानुष मारहाण प्रकरण : पोलिसांच्या कृत्यांमुळे सर्वत्र संताप

Sub-inspector Palve guilty of three offenses | उपनिरीक्षक पालवेंसह तिघांवर गुन्हा

उपनिरीक्षक पालवेंसह तिघांवर गुन्हा

कोल्हापूर : ट्रकमधील ३५ लाख रुपये किमतीच्या कापड चोरीचा गुन्हा वदवून घेण्यासाठी चौघा कामगारांच्या गुप्तांगावर केमिकल इंजेक्शन टोचून त्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संशयित गजेंद्र पालवे व दोघा कॉन्स्टेबलच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी जखमी दिनकर दादू शिंदे (वय २९, रा. किर्वे, ता. गगनबावडा) याने फिर्याद दिली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या या कृत्यांमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या इंजेक्शनचा दिनकर शिंदे व धनाजी पाटील यांना त्रास होत असून, त्यांची प्रकृ ती अद्यापही अस्थिर आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास स्वत: दिनकर शिंदे, त्याचा चुलत भाऊ दत्तात्रय शिंदे, बंकट थोडगे व किर्वे ग्रामस्थांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. जखमी दिनकर शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पुणे-बंगलोर महामार्गावरील गोकुळ शिरगाव येथील कणेरीवाडी येथील संदीप मोरे यांच्या पेट्रोलपंपावर माझ्यासह भिकाजी कांबळे, योगेश कांबळे व धनाजी पाटील असे चौघेजण कामास आहोत. ८ जुलै रोजी पेट्रोलपंपावर पार्किंग केलेल्या ट्रकमधील कापडांचे रोल चोरीस गेले होते. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी चौकशी केल्यानंतर २९ जुलैला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आम्हा चौघांना चौकशीसाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास बोलावून घेतले. सकाळी साडेदहा ते रात्री साडेदहापर्यंत आम्हा चौघांकडे बंद खोलीमध्ये स्वतंत्रपणे चौकशी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी चौघांच्याही हात व पायाच्या तळव्यावर पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर माझ्या व धनाजी पाटीलच्या अंगावरील कपडे काढून गुप्तांगावर केमिकल इंजेक्शन दिले. त्यानंतर पेट्रोलपंप मालक मोरे याठिकाणी आल्यानंतर आम्हाला सोडून दिले. आमचा या गुन्ह्णामध्ये काहीही संबध नसताना चौकशीसाठी बोलावून गुन्हा कबूल करण्यासाठी जबरदस्ती करीत अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी माझी त्यांच्या विरोधात तक्रार असल्याचे म्हटले आहे. या अमानुष मारहाणीमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sub-inspector Palve guilty of three offenses