रीलसाठी साडी आणण्याकरिता आली... ट्रकच्या धडकेत जीव गमावली; कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:48 IST2025-08-16T16:46:33+5:302025-08-16T16:48:34+5:30
मयत मूळची उंब्रजची, ट्रकचालक पसार

रीलसाठी साडी आणण्याकरिता आली... ट्रकच्या धडकेत जीव गमावली; कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : वर्गमित्राच्या दुचाकीवरून इन्स्टाग्रामवरील रिलसाठी साडी घेऊन जाताना सोन्या मारूती चौकातील भगतसिंग तरुण मंडळाजवळ सिमेंट मिक्सर रेडीमिक्स काॅंक्रीट ट्रकने धडक दिल्याने इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
श्रेया महेश देवळे (वय १९, मूळ गाव : उंब्रज, ता. कराड, जि. सातारा, सध्या रा : साळोखेनगर कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मिक्सरच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस फिर्यादीत म्हटले आहे, मयत श्रेया साळोखेनगरात मैत्रिणीसह शिक्षणानिमित्त राहते. बुधवारी दुपारी वर्गमित्र ओम संदीप पाटील (वय १९, रा. प्रथमेशनगर कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) याला रिल बनवण्यासाठी साडी हवी आहे, असे तिने सांगितले. ओम रात्री साडेनऊच्या सुमारास श्रेयाला दुचाकीवर मागे बसवून गंगावेश येथे आला.
मामाच्या घरातील साडी घेऊन पुन्हा गंगावेश पंचगंगा नदीमार्गे सोन्या मारूती चौकात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रकचालक दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे अचानक डावीकडे वळला. त्यावेळी ट्रकचे पाठीमागील डाव्या बाजूचे चाक ओमच्या दुचाकीला धडकले.
दुचाकी जमिनीवर पडल्याने ओम आणि मागे बसलेली श्रेयाही रस्त्यावर पडली. परिसरातील लोकांनी दोघांनाही उचलले. दुचाकीवर मागे बसलेल्या श्रेयाच्या डोक्याला आणि डाव्या हाताला जखम झाली होती. तातडीने श्रेयाला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ओम पाटील हाही जखमी आहे. त्याच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ट्रकचालक पसार
अपघात झाल्यानंतर लोकांची गर्दी झाली. जखमी श्रेयाला उचलण्यासाठी अनेकजण धावून आले. त्याचवेळी ट्रकचालक पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.