कोल्हापूर : मराठा समाजासाठीच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील शासकीय नोकरभरती थांबवा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. त्या मागणीसाठी या मोर्चाने कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये बुधवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. या मागणीबाबत राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा दि. २७ जानेवारीपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. शासनाकडून राज्यातील विविध विभागांमधील सुमारे ४० हजार पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. त्याबाबत मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य शासनाने कोणतीही शासकीय नोकरभरती करू नये, अशी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे. त्यासाठी मुंबईतील आझाद मैदान आणि पिंपळगाव (जालना) सुमारे २० वीस हजार मराठा बांधवांनी धरणे आंदोलन बुधवारपासून सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासह शासकीय नोकरभरती थांबविण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरमधील दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन तोडकर यांनी दिली. दरम्यान, या आंदोलनावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत शासकीय नोकरभरती थांबवा’, अशा आंदोलकांनी घोषणा दिल्या. या आंदोलनात दिलीप पाटील, संजय जमदाडे, उमेश साळोखे, प्रसाद जाधव, स्वप्निल पार्टे, धनश्री तोडकर, मेघा क्षीरसागर, सरस्वती थोरवत, जयश्री वायचळ, पुष्पा लोहार, विक्रांत मोहिते, अर्जुन शिंदे आदी सहभागी झाले. दरम्यान, जिजाऊ फाउण्डेशनने या आंदोलनाला पाठिंबा दिला.
चौकट
अन्यथा, बुधवारपासून आमरण उपोषण
ठिय्या आंदोलन हे मंगळवारपर्यंत (दि. २६) केले जाणार आहे. या मुदतीत सरकारने मराठा समाजाच्या मागणीबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा बुधवारपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे सचिन तोडकर यांनी सांगितले.
फोटो (२००१२०२१-कोल-मराठा क्रांती मोर्चा) : ‘एसईबीसी’ आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत शासकीय नोकरभरती थांबवा या मागणीसाठी कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.