पिंपळगाव येथील नागरिकांचे आमदार आबिटकर यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:46+5:302021-09-22T04:27:46+5:30

पिंपळगाव, ता. भुदरगड येथील ४४ बेघरांना घरे देण्यासाठी गावाच्या नजीक असलेल्या गायरानातील जमिनीवर प्लॉट पाडण्यात आले. शासनाच्या महाराष्ट्र जमीन ...

Statement of MLA from Pimpalgaon to MLA Abitkar | पिंपळगाव येथील नागरिकांचे आमदार आबिटकर यांना निवेदन

पिंपळगाव येथील नागरिकांचे आमदार आबिटकर यांना निवेदन

पिंपळगाव, ता. भुदरगड येथील ४४ बेघरांना घरे देण्यासाठी गावाच्या नजीक असलेल्या गायरानातील जमिनीवर प्लॉट पाडण्यात आले. शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत शासकीय योजनेमधून सन १९९०मध्ये गावच्या गायरानमधील जागेवर प्लॉट पाडून जागा देण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार, मंडल अधिकारी यांनी गावाशेजारील गायरान असलेल्या गट नं. १९२ मधील जागेत रितसर ४४ प्लॉट मंजूर करून वाटप करण्यात आले. त्यावेळी प्लॉट मंजूर झालेल्या ४४ जणांकडून शासकीय किंमत म्हणून प्रत्येकी चारशे रुपयेप्रमाणे पैसे जमा करून त्याची रीतसर पावतीही देण्यात आली. तेव्हा प्लॉटधारकांना पाणी, दिवाबत्ती यांची सोय करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे ग्रामपंचायतकडूनही पैसे जमा करून घेतले आहेत. त्यावेळी एका ग्रामस्थाने आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निकाल काय लागेल? या भीतीपोटी अनेकांनी प्लॉट मंजूर होऊनही येथे घरे बांधणे टाळले. यातील आठ लाभार्थींनीच घरे बांधली. त्यांची घरे ग्रामपंचायतीकडून नावावर झालीत. उर्वरित ३६ जणांनी घरे बांधलेली नाहीत. आता न्यायालयाचा निकाल या प्लॉटधारकांच्या बाजूने लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मंजूर प्लॉट सातबारा पत्रकी नोंद होऊन कब्जापट्टी मिळावी याबाबत गेली दोन वर्षांपासून प्लॉटधारकांकडून महसूल विभागाकडे रितसर पाठपुरावा करण्यात येत आहे. सर्व प्लॉटधारकांनी आमदार आबिटकर यांची भेट घेऊन हा विषय मार्गस्थ लावण्याचे निवेदन देऊन मागणी केली. अनेक वर्षे रेंगाळत पडलेला हा विषय मार्गस्थ होणे गरजेचे आहे. याकामी लवकरच प्रांताधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी बोलताना सांगितले.

यावेळी राजाराम सुतार, बाळासो कळसकर, सुधाकर पलाने, तुकाराम सुतार, केरबा घुरे, पांडुरंग पाटील, विठोबा पाटील, सिद्धार्थ कांबळे, बाळासो पंडे, शिवाजी खतकर, शिवाजी कुंभार, धनाजी टेंबुगडे, राजेंद्र मोरे, वैभव खतकर आदी उपस्थित होते.

Web Title: Statement of MLA from Pimpalgaon to MLA Abitkar