Kolhapur News: आईने कॉलेजला का गेला नाहीस म्हणून विचारले, रागात मुलाने टोकाचे पाऊल उचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:51 IST2026-03-12T13:50:01+5:302026-03-12T13:51:08+5:30
पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे

Kolhapur News: आईने कॉलेजला का गेला नाहीस म्हणून विचारले, रागात मुलाने टोकाचे पाऊल उचले
गडहिंग्लज : आईने ‘आज तू कॉलेजला का गेला नाहीस’? असे विचारल्याचा राग मनात धरून त्याने राहत्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमधील लाकडी तुळईला दोरीने गळफास घेतला. ओंकार बाबू कांबळे (वय १९, कुंबळहाळ, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे.
पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, कुंबळहाळ येथील बापू काडाप्पा कांबळे यांचा मुलगा ओंकार हा चिंचेवाडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका प्रथम वर्षात शिकत होता. अलिकडे दोन-चार दिवस तो कॉलेजला जात नव्हता. त्यामुळे कॉलेजला का जात नाहीस, अभ्यास कर, असे आईने त्याला सांगितले होते.
मंगळवारी (१०) सकाळी आई-वडील दोघेही नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. लहान भाऊ कॉलेजला गेल्यामुळे तो घरी एकटाच होता. घरी कुणी नसल्याचे पाहून त्याने घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये लाकडी तुळईला दोरीने गळफास घेतला.
दरम्यान, शेळ्यांना चारा टाकण्यासाठी आई माला शेडमध्ये गेल्या असता, त्यांना ओंकारने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. वडील बाबू कांबळे यांच्या वर्दीवरून घटनेची नोंद झाली आहे.
पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे
ओंकारचे वडील बाबू हे हलकर्णी येथील लाकडाच्या वखारीत मजुरी तर आई माला या शेतमजुरी करतात. बारावीनंतर तो अभियांत्रिकी पदविकेच्या पहिल्या वर्षात शिकत होता. दरम्यान, पोलिस भरतीसाठीही त्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, किरकोळ कारणावरून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.