शुभम कुडाळकरचा खून अनैतिक संबंधातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:33+5:302021-02-05T06:52:33+5:30

इचलकरंजी : शहापूर येथील शुभम दीपक कुडाळकर (वय २६, रा. मंगळवार पेठ) याच्या खुनाचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश ...

Shubham Kudalkar's murder due to immoral relationship | शुभम कुडाळकरचा खून अनैतिक संबंधातून

शुभम कुडाळकरचा खून अनैतिक संबंधातून

इचलकरंजी : शहापूर येथील शुभम दीपक कुडाळकर (वय २६, रा. मंगळवार पेठ) याच्या खुनाचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून कट रचून शुभम याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. सूरज शामराव कुंभार (वय २७, रा. कुडचे मळा), संकेत उमेश म्हात्रे (वय २३, रा. जवाहरनगर) व संतोष महांतेश बाडीगीर (वय २२, रा. कोरोची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुभम याला शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शहापूर येथे तुझे दोन हजार रुपये द्यायचे आहेत, असे सांगून या तिघांनी बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केला आणि तेथेच कोयता टाकून त्यांनी पळ काढला. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली. संशयितांच्या मोबाइल क्रमांकावरून शोध सुरू केला असता त्यांचे लोकेशन जत्राट (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक) येथे असल्याची माहिती समजली. तेथे जाऊन त्यांचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत ते शेतातून पसार झाले.

दरम्यान, शनिवारी दुपारी ते रांगोळी येथे आल्याची माहिती मिळताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, शुभम याचा नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याने खून केला असल्याची त्यांनी कबुली दिली. या प्रकरणातील संशयित संकेत याच्यावर हातकणंगले येथील पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश निकम, उपनिरीक्षक राजेंद्र यादव, फौजदार सूरज कोरवी, योगेश अवघडे, महेश कोरे, ज्ञानेश्‍वर बांगर, सुनील पाटील, शशिकांत ढोणे, जावेद आंबेकरी आदींच्या पथकाने केली.

चौकट

एका खुनाचा अद्याप उलगडा नाही. एका महिन्यामध्ये शहरात तीन खून झाले. यामध्ये दोन शहापूर पोलिसांच्या हद्दीत तर एक शिवाजीनगरच्या हद्दीत झाला. यातील दोन खुनांचा उलगडा झाला. मात्र, ६ जानेवारी रोजी शहापूर येथील एका चाळीस वर्षाच्या अज्ञाताच्या डोक्यात वर्मी घाव घालून खून करून मृतदेह खाणीमध्ये टाकला. त्याला महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला असून, अजूनही त्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले नाही.

Web Title: Shubham Kudalkar's murder due to immoral relationship