'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 21:25 IST2025-10-12T21:21:46+5:302025-10-12T21:25:26+5:30
MLA Shivaji Patil Honey Trap Case: भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा सख्ख्या बहीण भावाचा प्रयत्न फसला. पोलिसांननी त्यांना अटक केली असून, ते चंदगड तालुक्यातीलच आहेत.

'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
Shivaji Patil Honey Trap News: नाशिकमधील आमदार आणि राजकीय नेत्यांच्या हनी ट्रॅपच्या प्रकरण पडद्याआड गेलेले असताना असेच एक प्रकरण समोर आले. भाजपचे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. चंदगड तालुक्यातील सख्ख्या बहीण-भावानेच त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी जाळे टाकले. त्यांना अश्लील फोटो पाठवण्यात आले. मेसेज करण्यात आले. वर्षभर हे सुरू होतं. त्यानंतर पोलिसांपर्यंत प्रकरण गेलं आणि पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी मोबाइलद्वारे अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून पैशांची मागणी करणाऱ्या मांडेदुर्ग येथील बहीण-भावाला चंदगड पोलिसांनी शुक्रवारी (१० ऑक्टोबर) रात्री अटक केले. शनिवारी त्यांना ठाण्यातील चितळसर पोलिसांच्या ताब्यात दिले. बहीण-भावाच्या कारनाम्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणारे कोण?
मोहन जोतिबा पवार (वय २६) आणि शामल जोतिबा पवार (वय २६) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील रहिवाशी आहेत. मोहन व शामलने आमदार पाटील यांचा नंबर मिळवत वर्षभरापासून त्यांना अश्लील मेसेज व फोटो पाठवत होते.
बहीण भावाने सुरुवातीला चॅटिंग करून शिवाजी पाटील यांच्याकडे मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यानंतर मात्र अनेक तरुणींचे अश्लील फोटो आमदार पाटील यांना त्यांनी पाठवले.
आमदाराला धमक्या, ब्लॅकमेलिंग
राजकीय प्रतिमा मलीन करतो, अशी धमकी देत दोन ते तीन वेळा एकूण दहा लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुमची पोलिसात तक्रार करणार, अशी धमकीही त्यांनी आमदार शिवाजी पाटील यांना दिली. त्रास वाढल्यानंतर मात्र त्यांनी त्यांना ब्लॉक करून टाकले. पण, त्यानंतरही त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवला.
शेवटी आमदार पाटील यांनी ९ ऑक्टोबर रोजी अज्ञाताविरोधात चितळसर पोलिसात गुन्हा दाखल केला. याविषयीची बातमी प्रसिद्ध होताच संबंधित तरुण मोहन याने आमदार पाटील यांचे सावर्डे येथील कार्यालय गाठले.
'माझी चूक झाली, मला माफ करा, अशी चूक पुन्हा करणार नाही', अशी विनवणी केली. त्यानंतर काहींनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. शनिवारी अधिक चौकशी केल्यावर शामलचा सहभाग स्पष्ट झाला. दोघांनाही चितळसर पोलिसांच्या ताब्यात दिले.