कोल्हापूर : टेंबलाईवाडी (ता. करवीर) येथील जुन्या वाहनांची खरेदी, विक्री करणाऱ्यांच्या दोन क्रेटा, एक फॉर्च्युनर बनावट आरसी आणि टीटी फॉर्मवर बोगस सह्या करून परस्पर विकणाऱ्या सहा जणांच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून ५९ लाख ७० हजार रुपयांंच्या तीन कार जप्त केल्या. यातून बनावट कागदपत्रे तयार करून कार विकणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वाचा - २५ हजारांमध्ये बनावट आरसी बुक, कार विकून मोकळे; पोलिसांनी रॅकेट केले उघड याप्रकरणी नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३, रा. खेडी, शिवाजीनगर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), हसन मगदूम जहागीरदार (३१, रा. कारवांचीवाडी, जि. रत्नागिरी), मोहम्मद अमजद मोहम्मद अहसान कुरेशी (४३, रा. मॉडर्न हसनाबाद को-ऑप. सोसायटी, बेहराम बाग, जोगेश्वरी वेस्ट, मुंबई), सकिब सलीम शेख (२९, रा. सलमान मोहल्ला, संजेरी पार्क, ‘बी-विंग’, महापोली, ता. भिवंडी, जि. ठाणे), शहजामा खान बदरुजमा खान (३६, धंदा आरटीओ एजंट, रा. हत्ती खाना, जुना बाजार, जि. बीड), शेख शाहनवाज शेख आसेफ (४५, धंदा फोटो स्टुडिओ मालक, रा. पवनसूत्र मंगल कार्यालय, नगर रोड, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.