‘किफ्फ’चा पडदा आज उघडणार

By Admin | Updated: December 19, 2014 23:27 IST2014-12-19T23:00:23+5:302014-12-19T23:27:15+5:30

देश-विदेशांतील चित्रपटांची मेजवानी

The screen of Kiff opened today | ‘किफ्फ’चा पडदा आज उघडणार

‘किफ्फ’चा पडदा आज उघडणार

कोल्हापूर : कोल्हापुरातील चित्रपट चळवळीचा वारसा चालविणाऱ्या तिसऱ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (किफ्फ)चा पडदा उद्या, शनिवारी उघडणार आहे. शाहू स्मारक भवनमध्ये सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या समारंभात सिनेअभ्यासक व समीक्षक सुधीर नांदगावकर यांना चित्रतंत्रमहर्षी कै. आनंदराव पेंटर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
तब्बल आठ दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात दक्षिण कोरिया, फ्रान्स, हंगेरी, तैवान, बांगलादेश, रशिया, इराण, जर्मनी, यू. के., जपान, तुर्कस्तान, बेल्जियम, क्रोएशिया या देशांतील चित्रपट दाखविले जाणार आहेत. कोल्हापुरातील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारे तीन चित्रपट, त्यांच्या कारकिर्दीतील पोस्टर्स व चित्रपटातील स्थिरचित्रांचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. ‘विविध भारती’ या विभागात कोकणी, मल्याळम्, बंगाली, आसामी, तमीळ, कन्नड भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. ‘कंट्री फोकस’मध्ये चीनमधील तरुण दिग्दर्शकांचे नवीन चित्रपट दाखविले जाणार आहेत. ‘डायरेक्ट फोकस’मध्ये ग्रीक दिग्दर्शक कास्टा गॅव्हरास यांचे तीन महत्त्वपूर्ण चित्रपट दाखविले जाणार आहेत.
दिग्दर्शक गुलजार यांच्या गौरवार्थ त्यांनी दिग्दर्शित केलेल्या तीन चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. श्रद्धांजली विभागात व्ही. के. मूर्ती यांनी चित्रित केलेला गुरुदत्त यांचा चित्रपट व ब्रिटिश अभिनेता रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांनी दिग्दर्शित ‘क्लोजिंग द रिंग’ हा चित्रपट दाखविला जाईल.
‘माय मराठी’ विभागात सात अप्रदर्शित चित्रपट प्रेक्षक पसंती पुरस्कारासाठी स्पर्धेत असणार आहेत. महोत्सवात मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना अभिनेते दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या हस्ते ‘सिनेमाकेसरी कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. २७) महोत्सवाची सांगता होईल. (प्रतिनिधी)

Web Title: The screen of Kiff opened today