Kolhapur: जीएसटी कार्यालयातील स्क्रॅप मिळवून देतो, म्हणून स्क्रॅप व्यावसायिकाला ४५ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:01 IST2026-01-12T13:00:23+5:302026-01-12T13:01:17+5:30
जीएसटी कार्यालयातील शिपायावर गुन्हा दाखल; दोन दिवस पोलिस कोठडी

Kolhapur: जीएसटी कार्यालयातील स्क्रॅप मिळवून देतो, म्हणून स्क्रॅप व्यावसायिकाला ४५ लाखांचा गंडा
इचलकरंजी : येथील एका स्क्रॅप व्यावसायिकाला जीएसटी कार्यालयातील स्क्रॅप मिळवून देतो, असे आमिष दाखवून ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तौफिक मकसूद खान (४१, रा.बंडगर चौक) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जीएसटी कार्यालयातील शिपाई रसूल बाबू शेख (वय ५२, रा. बावडा, ता.करवीर) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रसूल आणि शोएक सलीम अथणीकर (रा. कुरूंदवाड, ता. शिरोळ) हे दोघेजण इचलकरंजीतील स्क्रॅप व्यावसायिक तौफिक यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी शोएब याने रसूल हा कोल्हापुरातील जीएसटी कार्यालयात साहेब आहे, अशी ओळख करून दिली. त्यावेळी रसूल याने जीएसटी न भरलेल्या कंपनीतील मशीनरी जप्त करून त्याची निविदा द्यायची आहे. निविदा घेण्यास तुम्ही इच्छुक असाल, तर ते मी मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यावेळी शोएब यानेही तू निविदा भरलास तर फायदा होईल. त्यासाठी ऑनलाइन रक्कम भरायची असल्याचे सांगितले.
स्क्रॅपची किंमत सुमारे दीड कोटी असून, त्याच्या निविदेची रक्कम ५५ लाख निश्चित आहे. त्यापैकी सुरुवातीला ५० टक्के रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार ३० मार्च २०२२ ते ९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बॅँकेतून आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे तौफिक यांनी ४५ लाख रुपये भरले. परंतु, निविदा निघाली नाही. याबाबत वारंवार विचारणा केली असता निविदा अद्याप निघाली नसल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापुरातील जीएसटी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता रसूल हा तेथे शिपाई असल्याचे आणि त्याने अनेकांना असे स्क्रॅपचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समजले. त्यामुळे तौफिक यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत रसूल याच्याविरोधात तक्रार दिली.