Kolhapur: बाबा, मी पोहोचले म्हणून फोन केला, अन् काही तासातच मुलीने जीवन संपवल्याचा निरोप आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:48 IST2025-08-12T14:47:28+5:302025-08-12T14:48:07+5:30
तिने वडिलांना सुखरूप पोहोचल्याचा फोनही केला. मात्र, दोनच्या सुमारास मुलीने आत्महत्या केल्याचा फोन वडिलांना गेल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली

Kolhapur: बाबा, मी पोहोचले म्हणून फोन केला, अन् काही तासातच मुलीने जीवन संपवल्याचा निरोप आला
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील एम. ए., एम. एस्सी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१, रा. सांगली) या विद्यार्थिनीने नैराश्येतून विद्यापीठातीलच सावित्रीबाई फुले वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.
गायत्री वसतिगृहातील रूम नंबर ५४ मध्ये इतर दोन मैत्रिणींसह राहत होती. ती रक्षाबंधनासाठी ८ ऑगस्टला आपल्या गावी गेली होती. सोमवारी सकाळी ती परत विद्यापीठात परतली. यावेळी ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. त्यानंतर मात्र तिच्या रूमचा दरवाजा बंदच होता. दुपारी दोनच्या सुमारास त्याच खोलीत राहणारी तिची सहकारी रूमवर आली असता, दरवाजा बंद असल्याचे दिसले. तिने अनेक वेळा गायत्रीला हाका मारल्या. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही.
तिने इतर मैत्रिणींच्या साहाय्याने दरवाज्याच्या वरील बाजूस असलेल्या खिडकीतून रूममध्ये डोकावले असता, फॅनला ओढणीने गळफास घेऊन गायत्रीने आत्महत्या केल्याचे दिसून आले. तत्काळ विद्यार्थिनी, सुरक्षारक्षकासह वसतिगृह अधीक्षक यांनी खोलीचा दरवाजा उघडला. त्यांनी राजारामपुरी पोलिसांना याची माहिती दिली.
मैत्रिणींनाही अश्रू अनावर
मुलीने आत्महत्या केल्याचे समजताच रेळेकर कुटुंब सांगलीहून त्वरित विद्यापीठात आले. यावेळी त्यांनी वसतिगृह परिसरात टाहो फोडला. गायत्रीच्या मैत्रिणींनाही अश्रू अनावर झाले. गायत्रीचा मृतदेह शेंडा पार्क येथे विच्छेदनासाठी नेला असता, तेथे तिच्या नातेवाइकांनी त्याला विरोध केला.
बाबा, मी पोहोचले अन्..
गायत्रीच्या वडिलांचे कापडाचे दुकान आहे. तिला चार बहिणी आहेत. सोमवारी अकरा वाजता ती गावाहून विद्यापीठात परतली. तिने वडिलांना सुखरूप पोहोचल्याचा फोनही केला. मात्र, दोनच्या सुमारास मुलीने आत्महत्या केल्याचा फोन वडिलांना गेल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. वसतिगृहात आल्यानंतर आई, वडील व बहिणींनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.